Pune News : हळदी-कूंकाचा कार्यक्रम घेणं पुण्यातील भाजपच्या नगरसेविकेला पडलं महागात, तिघांविरूध्द FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात देखील नियमांचे पालन न केल्याने तसेच पोलिस प्रशासनाची परवानगी न घेता हळदी-कुंकवाचा कार्यक्रम घेऊन भाजपच्या महिला नगरसेविकेला चांगलेच अंगलट आले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगरसेविका विजयालक्ष्मी मोतीलाल हरिहर, विष्णू आप्पा हरिहर व निर्मल मोतीलाल हरिहर (रा. गुरूवार पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई दीनेश खरात यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे सार्वजनिक कार्यक्रमांना मर्यादा घालून दिली आहे. तर कोणताही सार्वजनिक कार्यक्रम घेत असताना शासकीय नियमावलीचे पालन करणे आवश्यक आहे. तश्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पोलीस विभागाची परवानगी देखील बंधनकारक केली आहे. मात्र, संबंधित कार्यक्रमाची परवानगी न घेता भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका विजयालक्ष्मी हरिहर यांनी महात्मा फुले वाडा परिसरात जवळपास 2 हजार लोकांची गर्दी जमवत येथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता. तर हा कार्यक्रम सार्वजनिक रस्त्यावर विनापरवाना स्टेज टाकून घेतला गेला. येथे तिळगूळ वाटप व भेटवस्तूचे वितरण केले गेले. याची माहिती मिळताच पोलिसांनी चौकशी करत कोरोना नियमावलीचे पालन न केल्याप्रकरणी तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास खडक पोलीस करीत आहेत.