Pune News : पुणे महापालिकेत सत्ताधारी भाजप ‘भाकरी’ फिरविण्याच्या तयारीत !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय जनता पार्टीने पुणे महापालिकेमध्ये पदांची ‘भाकरी’ फिरविण्याचा निर्णय घेतला असून, पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पराभवानंतर यासाठी वेगाने घडामोडीही घडत आहेत. तब्बल १०० नगरसेवकांचे संख्याबळ असताना सव्वा वर्षावर आलेल्या महापालिका निवडणुकींना सामोरे जाताना पक्षाचा ‘परफॉर्मन्स’ सुधारण्यासाठी ही पावले उचलली जात असल्याची माहिती भाजपमधील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

भाजपने २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महापालिकेत प्रथमच स्वबळावर सत्ता स्थापन केली. सुमारे ९८ संख्याबळ असलेल्या भाजपमध्ये जुन्या अनुभवी नगरसेवकांसोबतच पक्षांतर करून भाजपमध्ये आलेल्या नगरसेवकांची संंख्याही अधिक आहे. या संख्याबळाच्या जोरावरही भाजपला मागील पावणेचार वर्षांत फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही, हे दिसून आले आहे. अशातच महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृहनेता अशा महत्त्वपूर्ण पदांवर बाहेरून आलेल्या नगरसेवकांना संधीच सोडा, परंतु त्यांच्या नावाचा विचारही केला जात नाही. अन्य समित्यांच्या बाबतही तसेच कामांच्या बाबतीतही पदाधिकार्‍यांकडून म्हणावी अशी साथ मिळत नाही. अशातच मागील ९ महिने कोरोनामुळे गेल्याने पक्षांतर करून आलेले अनेक नगरसेवक नाराज आहेत. अशातच नुकतेच पदवीधर मतदारसंघ निवडणुकीमध्ये पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाल्याने पक्षातील नाराजीचे पडसाद उमटू लागले आहेत. पक्षश्रेष्ठींनीही उर्वरित सव्वा वर्षात ‘टी २०’ सारखी चमकदार कामगिरी करण्याची क्षमता असलेल्या नव्या पदाधिकार्‍यांचा शोध सुरू केला आहे.

महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि सभागृह नेता या चारही पदांवर अन्य नगरसेवकांना संधी देऊन निवडणुकीपूर्वी आश्‍वासक वातावरण निर्मितीचे प्रयत्न सुरू आहेत. विद्यमान महापौर मुरलीधर मोहोळ यांनी वर्षभरात विशेषत: कोरोना काळात चांगले काम केले आहे. स्थायी समिती अध्यक्ष म्हणूनही याच टर्ममध्ये त्यांना संधी देण्यात आली आहे. यामुळे त्यांच्या छबीचा योग्य तो वापर करण्यासाठी त्यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. मागील स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे हे आमदारपदी निवडून आल्यानंतर मागील वर्षी याच सुमारास कांबळे यांच्या जागी हेमंत रासने यांच्याकडे अध्यक्षपद सोपविण्यात आले आहे. त्यांची मुदत आणखी तीन महिने आहे. त्यामुळे कार्यकाल पूर्ण होईपर्यंत त्यांना संधी द्यायची की, अन्य नगरसेवकाला या पदावर नियुक्त करायचे याचाही खल सुरू आहे.

सभागृह नेते धीरज घाटे यांना वर्षापूर्वी सभागृह नेतेपदी संधी मिळाली. परंतु संपूर्ण वर्ष कोरोनाच्या लढ्यात गेल्याने त्यांना कामगिरीत फारशी चमक दाखविता आली नाही, तर उपमहापौरपदी ऐनवेळी संधी मिळालेल्या सरस्वती शेंडगे यांची परिस्थिती घाटे यांच्यापेक्षा वेगळी राहिली नाही. किमान या दोन्ही पदांवर नवीन चेहेर्‍यांना संधी देण्याबाबत पक्षांतर्गत एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासाठी पक्षातील अनुभवी चेहेर्‍यांचा शोध सुरू असून, या पदांसाठी स्वीकृत सदस्यांपैकी काही नावांचाही विचार सुरू आहे. येत्या आठवडाभरात यासंदर्भात निर्णय होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.