Pune News : महापालिकेतील सत्ताधारी भाजपने अखेर भाकरी फिरविली, गणेश बिडकर यांची सभागृह नेतेपदी निवड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महापालिकेतील सत्ताधारी भाजपने अखेर भाकरी फिरविली. विद्यमान सभागृहनेते धीरज घाटे यांना बाजूला सारत अनुभवी गणेश बिडकर यांची सभागृह नेतेपदी निवड केली. आजच बिडकर यांना पक्षाच्यावतीने नियुक्तीचे पत्र देण्यात आले असून उद्या सकाळी ११ वाजता महापालिकेमध्ये भाजप नगरसेवकांची तातडीची बैठक बोलविण्यात आली असून ठराव करून या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.

गणेश बिडकर हे तीन वेळा महापालिकेवर निवडूण आले असून त्यांनी शहर सुधारणा समिती अध्यक्ष, स्थायी समिती अध्यक्ष आणि भाजप गटनेता ही पदे भुषविली आहेत. विशेष असे की काही वर्षांपुर्वी महापालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप आणि शिवसेनेच्या पुणे पॅटर्नची सत्ता गेल्यानंतरही राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्थायी समितीच्या अध्यक्षपदी बिडकर यांना संधी देउन पॅटर्नच्यावेळी दिलेला शब्द पाळला होता. विरोधात असतानाही सर्व पक्षाच्या गटनेत्यांशी समन्वयाची भुमिका आणि फ्लोअर मॅनेजमेंट यामुळे त्यांची कारकिर्द यशस्वी ठरली.

परंतू २०१७ च्या निवडणुकीमध्ये भाजप ९८ नगरसेवकांसह बहुमताने सत्तेत आल्यानंतरही बिडकर यांचा पराभव झाला होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना स्वीकृत सदस्यपदी संधी दिली. तेंव्हापासून बिडकर यांची सभागृहनेतेपदी वर्णी लागणार याची चर्चा होती. दरम्यान, महापालिकेत सत्तेत आल्यानंतर भाजपने पहिले अडीचवर्षे ज्येष्ठ नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांना सभागृहनेते पदाची संधी दिली. तर मागील वर्षी धीरज घाटे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली. मात्र, यानंतरही अनुभवाच्या कमतरतेमुळे तुलनेने संख्येने कमी असलेले परंतू अनुभवी विरोधकांपुढे सभागृहात भाजपचा परफॉर्मन्स काहीसा उणाच राहीला.

अशातच मागीलवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये दोन मतदारसंघातील पराभव आणि उर्वरीत मतदारसंघांमध्ये द्याव्या लागलेला निकराचा लढा, नुकतेच पदवीधर मतदारसंघातील लाजीरवाणा पराभव याची दखल भाजप श्रेष्ठींनी घेतली आहे. संघटनांत्मक पातळीवर पदांची खिरापत वाटून शक्य तेवढ्यांना टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतानाच भाजपने महापालिकेतही भाकरी फिरविण्याचा निर्णय घेतला. यातूनच गणेश बिडकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, स्वीकृत सदस्य सभागृहनेते पदी निवडण्याची महापालिकेच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. जनतेतून निवडूण आलेल्या ९८ नगरसेवकांपैकी एकही या पदाला पात्र ठरू नये, ही भाजपची शोकांतिका आहे. यामुळे भाजपमध्ये येत्या काळात खदखद वाढणार असून आगामी निवडणुकांच्या तोंडावर मोठ्याप्रमाणावर आयात मंडळींची घरवापसी होण्याची चर्चा सुरू झाली आहे.