Pune News : रोटरी मिक्स विंटर कप क्रिकेट 2021 स्पर्धेत बीकेसी स्ट्रायकर्स, वाणी वॉरियर्स संघांची विजयी सलामी

पुणे (Pune) – रोटरी डिस्ट्रिक 3131 यांच्या तर्फे आयोजित रोटरी मिक्स विंटर कप (Rotary Mix Winter Cup Cricket 2021) क्रिकेट 2021 स्पर्धेत गटसाखळी फेरीत बीकेसी स्ट्रायकर्स आणि वाणी वॉरियर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून उदघाटनाचा दिवस गाजवला.

आरएस खांदवे येथील क्रिकेट मैदान व लिजेंड्स क्रिकेट मैदानावर आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत अ गटाच्या सामन्यात सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या फैयाज लांडगे (3-30) याने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत बीकेसी स्ट्रायकर्स संघाला अल्टीमेट ऍडव्हेंचर्स संघाविरुद्ध 14 धावांनी विजय मिळवून दिला. पहिल्यांदा खेळताना बीकेसी स्ट्रायकर्स संघाने 15 षटकात 7 बाद 136 धावा केल्या. यात अविनाश बारणे नाबाद 28 धावा, अतुल भगत 17 धावा, अनिल मांडके 16 धावा, सुनील मंधन 14 धावा, श्रीधर प्रभू 12धावा यांनी संघाच्या डावाला आकार दिला. अल्टीमेट ऍडव्हेंचर्सकडून विजय कोतवाल (2-18), आनंद मेघरजनी (1-2), शेखर दालमिया (1-11), भरत पुनुमिया (1-21) यांनी सुरेख गोलंदाजी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना अल्टीमेट ऍडव्हेंचर्स संघाला 15 षटकात 8 बाद 122 धावापर्यंत मजल मारता आली. यात महेश दिवटे 33, शिरीष भोपे 30, गणेश कुदळे 16, धीरज कदम 13 यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. बीकेसी स्ट्रायकर्स संघाकडून फैयाज लांडगे 30 धावात 3 गडी, तर कैलाश पारीख(1-11), अविनाश बारणे(1-22)यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. सामनावीर फैयाज लांडगे ठरला.

दुसऱ्या सामन्यात ब गटाच्या सलामीच्या लढतीत भूषण देशपांडे (3-17 व नाबाद 19 धावा) याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर वाणी वॉरियर्स संघाने कु-बिल्ट मास्टर्स संघावर 7 गडी राखून विजय मिळवत विजयी सलामी दिली. प्रथम फलंदाजी करताना विक्रम खैय्या 32 धावा, राहुल कामठे 23 धावा व संतोष जाधव 17 यांनी केलेल्या धावांच्या जोरावर कु-बिल्ट मास्टर्स संघाला 15 षटकात 6 बाद 100 धावा करता आल्या. वाणी वॉरियर्स संघाकडून भूषण देशपांडे(3-17), विजय नवले(2-14), सुधीर काकडे (1-21) यांनी सुरेख गोलंदाजी करत कु-बिल्ट मास्टर्स संघाला 100धावावर रोखले. याच्या उत्तरात वाणी वॉरियर्स संघाने हे आव्हान 12.1 षटकात 3बाद 104 धावा करून पूर्ण केले. यामध्ये सागर निकलजे 27 धावा,महेश घोरपडे नाबाद 24 धावा, अरविंद चौहान 18 धावा,भूषण देशपांडे नाबाद 19 धावा करून संघाच्या विजयात महत्वाचा वाटा उचलला. सामन्याचा मानकरी भूषण देशपांडे ठरला.

स्पर्धेचे उदघाटन डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो.रश्मी कुलकर्णी आणि रोटरी डिस्ट्रिक 3131 चे क्रीडा विभागाचे संचालक रो. प्रमोद पालीवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एचयुव्हीइ फार्माचे सरव्यवस्थापक डॉ.देवेंद्र हुडा आदी मान्यवर उपस्थित होते.