Pune News : बुक केलेली सदनिका परस्पर त्रयस्थाला विकली; बिल्डरला बुकिंगची रक्कम ग्राहकाला परत करावी लागणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बुक केलेली सदनिका परस्पर त्रयस्थाला विकणा-या एका बांधकाम कंपनीला महागात पडले आहे. बुकींगच्या वेळी भरलेले ५१ हजार रुपये १ एप्रिल २०१९ पासून १० टक्के व्याजाने तक्रारदारांना परत द्यावे लागणार आहेत. तसेच नुकसानभरपाई पोटी १५ हजार, तक्रारीच्या खर्चापोटी १ हजार रुपये देखील बिल्डरला मोजावे लागणार आहे.

संबंधित रक्कम परत करण्याचे आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष जयंत देशमुख, सदस्य अनिल जवळेकर, शुभांगी दुनाखे यांनी दिला आहे. याबाबत योगेश बोरसे यांनी यशोन्मुख कन्स्ट्रक्शन्स विरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रारदार बोरसे यांना सदनिका खरेदी करायची होती. त्यांनी बिल्डरच्या हवेली तालुक्यातील वडमुखवाडी येथील एका प्रकल्पात सदनिका खरेदी करण्याचे ठरवले. त्या प्लॅटची किंमत १८ लाख रुपये निश्‍चित करण्यात आली होती.

बुकिंगसाठी तक्रारदारांनी ५१ हजार रुपये दिले. मात्र खरेदीचा करारनामा वेळेत करून देण्यात आला नाही. बुकिंगची रक्कम परत करण्याची वारंवार मागणी करून देखील कंपनीने ५१ हजार रुपये परत न केल्यामुळे तक्रारदार यांनी आयोगात धाव घेत तक्रार दाखल केली. सदनिकेच्या बुकींगवेळी भरलेले ५१ हजार रुपये सव्याज, नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी तक्रार अर्जात करण्यात आली होती. त्यावर दोन्ही पक्षांचे म्हणणे लक्षात घेत विरोधी पक्षाने त्रृटी युक्त सेवा दिल्याचा निष्कर्ष नोंदवत ५१ हजार रुपये १० टक्के व्याजाने परत करण्याचा आदेश आयोगाने दिला.

तर त्या ठिकाणी दुसरचे कोणीतरी राहात होते :
दरम्यान तक्रारदार हे सदनिकेची पाहणी करण्यासाठी गेले असता तेथे दुसरीच व्यक्ती राहात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्याबाबत विचारणा केली असता ही सदनिका कंपनीने विकली असल्याचे त्यांना सांगण्यात आले. याबाबत कंपनीकडे विचारणा करत बुकिंगसाठी भरलेले ५१ हजार रुपये परत देण्याची मागणी केली