Pune News : पार्सलद्वारे पाठवलेले बॉक्‍स गहाळ करणार्‍याला द्यावे लागणार साहित्याचे पैसे, ग्राहक आयोगाचे आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पार्सलद्वारे पाठवलेले ग्राहकाचे साहित्य गहाळ केल्याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने एका पॅकर्स व मूव्हर्स कंपनीला दणका दिला आहे. गहाळ झालेल्या वस्तूंचे 16 हजार रुपये 45 दिवसाच्या आत तक्रारदाराला द्यावेत. तसेच तक्रारीच्या खर्चापोटी दोन हजार रुपये देण्यात यावेत, असा आदेश आयोगाचे अध्यक्ष जयंत देशमुख, सदस्य शुभांगी दुनाखे, अनिल जवळेकर यांनी दिला आहे.

याबाबत मोपेद्रकुमार यांनी सोबीर सिंग, पॅकर्स व मूव्हर्स विरुद्ध ग्राहक मंचात तक्रार दाखल केली होती. तक्रारदार हे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मुंढवा येथून त्यांचे साहित्य छत्तीसगड येथील धामात्री येथे पाठवायचे होते. त्यासाठी आठ हजार रुपये देण्याचे ठरले. पॅकर्स कंपनीने तक्रारदार यांचे साहित्य नऊ बॉक्‍समध्ये पॅक करून 17 ऑगस्ट 2019 रोजी पुण्याहून पाठवून दिले. त्यावेळी ते साहित्य 4 ते 6 दिवसात धामात्री येथे पोचेल असे सांगण्यात आले. मात्र ते थेट एका महिन्यानंतर पोचले. त्यावेळी त्यात दोन बॉक्‍स कमी होते.

याबाबत तक्रारदार यांनी कंपनीला कॉल केला असता तुमचे बॉक्‍स नागपूर येथील ग्राहकाकडे गेले आहे. लवकरच ते बॉक्‍स परत पाठवू, असे त्यांना सांगण्यात आले. बॉक्‍स परत देऊ शकलो नाही तर पैसे देऊ, असे त्यावेळी स्पष्ट करण्यात आले होते. मात्र बॉक्‍स न मिळाल्याने तक्रारदार यांनी कंपनीकडून नागपूर येथील ग्राहकांचा संपर्क क्रमांक घेऊन त्याच्याशी संपर्क केला. तुमचे बॉक्‍स माझ्याकडे आले नाहीत. माझे देखील साहित्य कंपनीने हरवले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर तक्रारदार यांनी कंपनीला वेळोवेळी कॉल केला. मात्र त्यांना ना बॉक्‍स परत मिळाले ना पैसे. त्यामुळे तक्रारदार यांनी ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली.