Pune News : अल्पवयीन प्रेयसीवर बलात्कार करणाऱ्या प्रियकराला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा, केला होता सारसबागेत फिरवण्याचा बहाणा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन प्रेयसीवर बलात्कार करणाऱ्याला प्रियकराला न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश आर. व्ही. अदोणे यांनी हा निकाल दिला.

दत्ता अलिंगन ढावरे (वय १९, रा. रामटेकडी, हडपसर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत १५ वर्षीय पीडितेच्या आईने वानवडी पोलिसात फिर्याद दिली आहे. १४ एप्रिल २०१७ रोजी सकाळी पीडित ट्युशनला जाते म्हणून, घरातून निघून गेली. मात्र रात्री पुन्हा घरी आलीच नाही. त्यामुळे घरच्यांनी ती हरविल्याची तक्रार पोलिसात दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ती परत आली. त्यावेळी चौकशी केली असता, ढावरे याने सारसबाग फिरविण्याचा बहाणा करून तिला घेऊन गेल्याचे सांगितले. त्यानंतर पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर विश्‍वासात घेऊन चौकशी करण्यात आली. त्यावेळी तीन-चार महिन्यापूर्वी स्वत:च्या घरात त्याने लग्नाच्या आमिषाने तिच्याशी शरीर संबंध प्रस्थापित केल्याचे सांगितले होते.

या खटल्याचे कामकाज सरकार पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील लीना पाठक यांनी पाहिले. त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी पोलिस हवालदार पी. पी. पवार, ए. एस. गायकवाड यांनी मदत केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यावर युक्तिवाद करताना अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी सरकारी वकील लीना पाठक यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने बाललैंगिक अत्याचार कायदा कलम सहा आणि भादवी कलम ३७६ (बलात्कार) नुसार १० वर्षे सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंड, ३६३ (पळवून नेणे) नुसार एक वर्ष सक्तमजुरी आणि एख हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दोन्ही शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत. दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.