Pune News : खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिकाच्या ऑफिस बॉयचे अपहरण

पुणे : बांधकाम व्यावसायिकाकडील ऑफिस बॉयचे तिघांनी जबरदस्तीने अपहरण करुन त्याच्या सुटकेसाठी खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आहे. याप्रकरणी गण्या व त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या ऑफिस बॉय म्हणून काम करणार्‍या मुलाने गुन्हेगारांचे भांडण सुरु असताना रात्री स्वत:ची सुटका करुन घेतली आहे.

याप्रकरणी साईकमार शिवमुर्ती जावळकोटी (वय ५१, रा. सिंहगड रोड) यांनी वारजे पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ते बांधकाम व्यावसायिक असून त्यांचे वारजे येथे कार्यालय आहे. त्यांच्याकडे १८ वर्षाचा मुलगा ऑफिस बॉय म्हणून काम करतो. बुधवारी सकाळी तो शिवगंगा सोसायटीतील मायरा इनक्लेव्ह येथील कार्यालयात आला असताना गण्या व त्याच्या दोन साथीदाराने त्याला जबरदस्तीने रिक्षामध्ये बसविले. त्यानंतर त्यांनी जावळकोटी यांना वेगवेगळ्या चार मोबाईलवरुन फोन करुन मुलाला सोडून देण्यासाठी २ लाख रुपयांची खंडणी मागितली. जावळकोटी यांनी तातडीने याची माहिती वारजे पोलिसांना दिली. पोलिसांनी या मुलाचा शोध सुरु केला.

या तिघा अपहरणकर्त्यांनी त्याला येरवडा येथील लक्ष्मीनगर भागात एका खोलीत कोंडून ठेवले होते. त्यांच्यात पैसे मागण्यावरुन व ते कोठे घेण्यासाठी बोलवायचे यावरुन वाद सुरु झाला. ते तिघे भांडू लागले ही संधी साधून या मुलाने कोणाला काही समजायच्या आत त्या खोलीतून पलायन केले. वारजे पोलिसांनी अपहरण व खंडणीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक शिवदास गायकवाड अधिक तपास करीत आहेत.