Pune News : सराफा व्यावसायिकाच्या चारचाकीतून 55 लाखांच्या दागिन्यांची बॅग लंपास करणारा अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  सराफा व्यावसायिकाच्या चारचाकीतून 55 लाखांच्या दागिन्यांची बॅग चोरणा-यास फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे.

शंकर लक्ष्मण आचारी ऊर्फ शेट्टी (वय 35, रा. ओस्माने, ता. भद्रावती, जि. शिमोगा) असे आरोपीचे नाव आहे. चोरीला गेलेला मुद्देमाल अद्याप त्याकडून जप्त करण्यात आलेले नाही.

याबाबत करण प्रदीप माळी (वय 25, रा. देहूगाव) यांनी फिर्याद दिली आहे. 31 डिसेंबर रोजी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास करण हे रविवार पेठ परिसरात आले होते. त्यावेळी, शंकर व त्याच्या साथीदारांनी फिर्यादी यांच्या चारचाकीमधील 55 लाख 62 हजार 800 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असलेली बॅग चोरली होती. याप्रकरणी, फरासखाना पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांना शंकर याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्याला अटक करीत न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरोपीने चोरलेले दागिने कर्नाटकात नेऊन विकल्याची शक्‍यता आहे. त्यामुळे तिकडे जाऊन तपास करावयाचा आहे. आरोपीचे कोणी साथीदार आहेत का? तसेच त्यांनी गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त करायची आहेत. त्यामुळे त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील सुरेखा क्षीरसागर यांनी केली. सरकारी वकिलांची मागणी मान्य करीत न्यायालयाने आरोपीला सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.