Pune News : लोहगाव व बुधवार पेठेत घरफोड्या, 2 लाखांचा ऐवज लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात घरफोड्याचा धुमाकूळ सुरूच असून, लोहगाव व बुधवार पेठेत दोन फ्लॅट फोडून चोरट्यांनी 2 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

याप्रकरणी फरासखाना व विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरासखाना पोलीस ठाण्यात 46 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी या बुधवार पेठेतील पालेकर वाडा येथे राहतात. त्या 20 फेब्रुवारी रोजी कुटुंबासह कामाच्या निमित्ताने बाहेर गेल्या होत्या. ही संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व घरात ठेवलेले 25 हजार 300 रूपयांचे चांदीचे दागिने चोरून नेले. फिर्यादी 22 फेब्रुवारी रोजी परत आल्यानंतर त्यांना घरफोडीचा प्रकार दिसून आला. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिस चोरट्यांचा माग काढत आहेत.

तर दुसरा प्रकार लोहगाव येथे घडला आहे. आनंत गिरीगोसावी यांच्या घरातून 1 लाख 47 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी 20 जानेवारी रोजी रात्री कामाच्या निमित्ताने गावी गेले होते. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी-कोयंडा उचकटून व खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला. तसेच लॉकर तोडून डब्यात ठेवलेले 1 लाख 47 हजार रूपये किंमतीचे सोने व चांदीचे दागिने चोरून नेले. फिर्यादी नुकतेच गावावरून परत आले त्यावेळी त्यांना घरफोडीचा प्रकार दिसून आला आहे. अधिक तपास विमानतळ पोलिस करत आहेत.