Pune News : बिअरच्या बाटलीने बस चालकास मारहाण, एकास अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  बसचा हॉर्न का वाजवला? असे म्हणत बिअरच्या बाटलीने शिवनेरी बसच्या चालकास गंभीर मारहाण केल्याप्रकरणात बंडगार्डन पोलिसांनी एकाला अटक केली आहे. न्यायालयाने त्याची १० फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.

बादल महेंद्र ढावरे (वय २६, रा. कडबा कुटीजवळ, मंगळवार पेठ) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी बसचालक अमोल अंकुश गायकवाड (वय ३४, रा. किवळे) यांनी फिर्याद दिली आहे. मारहाणीचा हा प्रकार रविवारी (ता. ७) रात्री अकराच्या सुमारास मालधक्का रस्त्यावर घडला. या प्रकरणी प्रेम कानडी (वय २२) आणि मेहबूब शेख (वय २२) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी बिअरची बाटली फिर्यादींच्या डोक्यात मागील बाजूस मारली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळही केली. आरोपींच्या हल्ल्यात गायकवाड हे गंभीर जखम झाले आहेत.

या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी बादल याला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी न्यायालयाकडे केली होती. ॲड. जाधव यांचा युक्तिवाद मान्य न्यायालयाने आरोपीची पोलिस कोठडीत रवानगी केली.