Pune News : जादा परताव्याच्या बहाण्यानं 15 लाखांची फसवणूक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शेअर मार्केटच्या व्यवसायात चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून मित्रालाच 15 लाख रुपयांना गंडा घातला आहे. डिसेंबर महिन्यात हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी ओमकार मनोहर सुतार (वय 34, बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राघव चिंतावर (रा.शिवणे, मूळ तेलंगान) आणि नरेश बाबू (रा. नांदेड सिटी) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्यादी एकमेकांचे मित्र आहेत. आरोपी हे मूळचे तेलंगणा राज्यातील आहेत. त्यांची पुण्यात आल्यानंतर ओळख झाली होती. आरोपी राघव चींतावर याने फिर्यादीला आपला मित्र नरेश बाबू हा शेअर मार्केटचा व्यवसाय करतो. त्याच्याकडे गुंतवणूक केल्यास तो चांगला परतावा देईल असे आमिष दाखविले होते. तसेच त्यांचा विश्वास संपादन केला. यावर फिर्यादी यांनी विश्वास ठेवून फिर्यादी यांनी वेळोवेळी त्यांच्या बँक खात्यातून एकूण 15 लाख रुपये बँक खात्यात ट्रान्सफर केले. मात्र, आरोपीनी फिर्यादीला कोणताही परतावा न देता तसेच त्याने गुंतवलेले पैसे परत न करता त्यांची फसवणूक केली आहे. अधिक तपास बिबवेवाडी पोलीस करत आहेत.