Pune News : ‘जीवनसाथी’वर झाली महिलेसोबत ओळख, भावाला पुणे महापालिकेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने 4 लाखाची फसवणूक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – जीवन साथी डॉटकॉमवर ओळख झाल्यानंतर त्या महिलेला विश्वासात घेत त्यांच्या भावाला पुणे महानगरपालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवत 4 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यापूर्वी देखील महिला, तरुणांना पालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसविण्यात आले आहे.

याप्रकरणी मांजरी बुद्रुक परिसरात राहणाऱ्या 30 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार हर्षल पोस्ट हरिश्चंद्र प्रभाकर बटुळे (वय 30, रा. डावखरे बिल्डिंग, आळंदी रोड विश्रांतवाडी) याच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मांजरी येथील गोसावी वस्ती येथे राहण्यास आहेत. आरोपी व फिर्यादी यांची जीवनसाथी डॉटकॉम ओळख झाली होती. ओळख झाल्यानंतर ते एकदा कुटुंबा समवेत भेटले देखील. यामुळे फिर्यादी यांचा विश्वास बसला. याचाच फायदा त्याने घेतला. विश्वास संपादन करत फिर्यादी यांना त्यांच्या भावाला पुणे महानगरपालिकेत अतिक्रमण विभागामध्ये सहाय्यक अधिकारी या पदावर कामास लावतो, असे सांगितले.

यानंतर त्यासाठी फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी चार लाख रुपये घेतले. पण तरीही नोकरी लावली नाही. तर याबाबत विचारपूस केल्यानंतर टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी फिर्यादी यांना फसवणूक झाली असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार केली. हडपसर पोलिसांनी प्राथमिक चौकशी करून गुन्हा दाखल केला. अधिक तपास उपनिरीक्षक गाडेकर हे करत आहेत.