Pune News : व्यावसायिकासह शेतकर्‍यांची लाखोंची फसवणूक ! आशिष अरणकल्लेला अटक, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लॉकडाऊनच्या काळात भाजीचा व्यवसाय करण्याचे आमिष दाखवत एका व्यावसायिकासह शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आतापर्यंत फसवणूकीचा आकडा हा सव्वा कोटी रुपयांपर्यंत गेला आहे.

आशिष अरुण अरणकल्ले (रा. आंबेगाव बुद्रुक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अविनाश पासलकर (वय 34) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा बांधकाम साईडला लागणारे साहित्य पुरविण्याचा व्यवसाय आहे. दरम्यान त्यांची व आरोपीची ओळख आहे. गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग वाढल्याने मार्च महिन्यात लॉकडाऊन झाले होते. सर्व व्यवहार ठप्प होते. पण अत्यावश्यक सेवा म्हणून, दूध, भाजीपाला आणि किराणा हा व्यवसाय सुरू होता. त्याची मोठी उलाढाल या काळात झाली. अनेकांनी भाजी विक्रीसह इतर व्यवसाय या काळात केले.

दरम्यान आरोपी आशिष याने देखील फिर्यादी यांना आपण भागीदारीत भाजी विक्रीचा व्यवसाय करू, ज्यातुन मोठा नफा होईल असे आमिष दाखवले. त्यांना दिवसाला हजारो रुपये मिळतील याची आकडेबेरीज करून दाखवली. त्यांच्यासोबत इतर देखील दोघांना अश्याच प्रकारे भुरळ घातली. फिर्यादी यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. प्रथम काही पैसे दिले. यावेळी आरोपीने त्यांना परतावा म्हणून काही पैसे दिले. यामुळे फिर्यादी यांचा विश्वास बसला. यानंतर त्यांनी वेळोवेळी एकूण 87 लाख रुपये दिले. त्यातील केवळ 3 लाख रुपये परत करत त्यांचे 84 लाख रुपये परत केले नाही. तर त्यांच्यासोबत इतर दोघांनी देखील पैसे दिले आहेत. त्यांचेही पैसे परत केले नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्याने अनेक शेतकऱ्यांकडून कांदे तसेच इतर भाजीपाला घेऊन त्यांचेही पैसे न देता फसवणूक केली आहे.

ही फसवणूक दीड कोटी रुपयांपर्यंत असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. आणखी काही तक्रारी येत असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याला याप्रकरणी अटक करण्यात आली असून, आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी सांगितले.