Pune News : मुलाने आईला पोटगी दिली नाही, मुलाची मालमत्ता जप्त करण्याचे न्यायालयाचे आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   न्यायालयाने मुलास आईला दरमहा पाच हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले होते. परंतु मुलाने आईला पोटगी दिली नाही तसेच न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले. मुलाने पोटगी भरण्यास कसूर केल्याने सदर पोटगीची थकबाकी रक्कम चार लाख वीस हजार इतकी झाली. त्यामुळे न्यायालयाने या रकमेकरिता मुलाची जी जंगम मालमत्ता आहे ती जप्त करावी, असे आदेश बंडगार्डन पोलिसांना दिले आहेत. हे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी फौजदारी न्यायालय क्रं.3 न्यायाधीश टी.एम. निराळे यांनी दिले आहेत.

या केसमधील अनुसया सोनी यांचे पती वारले आहेत. त्यांचा मुलगा आनंद सोनी हा त्यांना सांभाळत नसल्याने त्यांनी अ‍ॅडव्होकेट सुरेंद्र आपुणे व रमेश परमार यांच्यावतीने न्यायालयांमध्ये अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने त्यांना दरमहा रक्कम पाच हजार रुपये इतकी पोटगी मंजूर केली होती व मुलास ती भरण्याचे आदेश दिले होते.

अनुसया सोनी यांना जगण्याकरिता पोटगी व्यतिरिक्त इतर कुठलेही साधन नाही. लॉकडाऊन पूर्वी न्यायालयाने मुलगा आनंद सोनी यास पोटगीची काही रक्कम भरण्यास सांगितले होते. परंतु त्याने न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे न्यायालयाने आनंद सोनी यांच्या विरोधात जंगम मालमत्ता जप्तीचे वॉरंट काढले. आनंद सोनी यांच्याकडे असलेली जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश बंडगार्डन पोलिसांना देण्यात आले आहेत. तसेच या ही कार्यवाही तत्काळ करुन 17 एप्रिल 2021 रोजी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्यास पोलिसांना सांगण्यात आले आहे.