Pune News : उद्याने सुरू न झाल्याने नागरिकांचा ‘हिरमोड’, उपनगरातील उद्याने बंदच

पुणे – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली उद्याने सुरू करण्यासाठी महापालिका प्रशासनाने सोमवारी (दि. 25 जानेवारी) गाजावाजा केला, त्यासंबंधीचे वृत्तही वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाले. त्यामुळे नागरिकांनी आज सोमवारी सकाळी उद्यानासमोर गर्दी केली होती. मात्र, उद्याने सुरू न झाल्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. आता उद्याने नेमकी कधी सुरू होणार आहेत, असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला.

हडपसरमधील डॉ. राम मनोहर लोहिया उद्यान सुरू होणार असल्याची बातमी आम्ही वृत्तपत्रामध्ये वाचली होती. त्यामुळे आज सकाळी वॉकिंगसाठी आलो होतो. मात्र, उद्यान बंद असल्याने आमचा हिरमोड झाल्याचे राजेंद्र राऊत यांनी सांगितले. माझ्यासह अनेकजण आज उद्यानामध्ये फिरण्यासाठी आले होते. महापालिकेच्या उद्यान विभागाने हडपसरमधील उद्याने कधी सुरू केली जाणार आहेत, याचा खुलासा केला तर नागरिकांनी फसगत होणार नाही, असे त्यांनी सांगितले.

शहर आणि उपनगरातील उद्याने सुरू करणार असल्याचा प्रशासनाने गाजावाजा केला. मात्र, उद्याने सुरू झाली नाहीत, त्यामुळे ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. मात्र, उद्यानाची स्वच्छता, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहाची देखभाल दुरुस्ती, सुरक्षा रक्षक, विद्युत दिवे आदींची व्यवस्था करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागिल दहा महिन्यांपासून उद्याने बंद आहेत. त्यामुळे स्वच्छता करून, सॅनिटायझरची फवारणीही करणे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले.

हडपसरमधील मगरपट्टा चौकातील डॉ. राम मनोहर लोहिया उद्यान, हडपसर गावातील प्रा. ग. प्र. प्रधान नक्षत्र उद्यान, गोंधळेनगरमधील हेमंत करकरे उद्यान अशी अनेक उद्याने बंद आहेत. या उद्यानांमधील स्वच्छतागृहांमध्ये पाण्याचे नळ चोरीला गेले आहेत. दरवाजांच्या कडीकोयंडे तुटले आहेत. वॉकिंग ट्रॅकची दूरवस्था झाली आहे. उद्याने सुरू होताच उद्यानाच्या प्रवेशद्वारासमोर कारले, गव्हांकूर, लिंबू असे विविध प्रकारचे ज्यूस विक्रेते गर्दी करणार आहेत. तसेच वडापाव, चहाची दुकानेही थाटली जाणार आहेत. आता मगरपट्टा चौकातील डॉ. राम मनोहर लोहिया उद्यानासमोर खेळणी, खाद्यपदार्थ विक्रेत्यांची सायंकाळी गर्दी होत असते. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होणार नाही, यासाठीही उद्यान विभागाने दक्षता घेणे गरजेचे आहे.

शहर-उपनगरातील 81 उद्यानांपैकी 60 उद्याने सोमवारी सुरू होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. अनेक उद्यानांमध्ये ओपन जीम आहे, त्यांचीही देखभाल दुरुस्ती केली गेली नाही. पावसाच्या पाण्याने अनेक मशिनरी गंजल्या असण्याची दाट शक्यता आहे. वॉकिंग ट्रॅक, लहान मुलांची खेळणी, लॉन आदीची साफसफाई होणे महत्त्वाचे ठरणार आहे. महत्त्वाचे म्हणजे पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहातील नळ तसेच टॅप सुरू करणे आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे.

हडपसरमधील पहिले-वहिले आणि मध्यवर्ती ठिकाणी असलेले डॉ.राम मनोहर लोहिया उद्यान आज सुरू होणार असल्याने नागरिकांनी भल्या सकाळी गर्दी केली होती. मात्र, प्रवेशद्वार बंद होते. उद्यान सुरू होणार की बंद याविषयी कोणतीही माहिती तेथे दिली गेली नव्हती. त्यामुळे हडपसरवासियांनी प्रशासनाचा तीव्र संताप व्यक्त केला.