Pune News : स्थानिकांना रोजगार न देणाऱ्या कारखानदारावर त्यांना देण्यात येणाऱ्या परताव्यात कपात करणार : उद्योगमंत्री सुभाष देसाई

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाईन – ( सचिन धुमाळ ) – महाराष्ट्र शासनाच्या वतीने औद्योगिक( MIDC) क्षेत्रातील उद्योगधंद्याना पूर्णतः सहकार्य करण्यात येत असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी रांजणगाव येथे सांगितले. शिरुर तालुक्याच्या रांजणगाव औद्योगिक क्षेञातील (MIDC) रांजणगाव इंडस्ट्रीयज असोसिएशनच्या नूतन वास्तूचे उदघाटन उद्योगमंत्री देसाई यांच्या हस्ते झाले,यावेळी ते बोलत होते.

या वेळी  कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील,माजी आमदार पोपटराव गावडे,आंबेगाव शिरुर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनब्लगन, उपअभियंता एस. एन. चौडेकर, रांजणगाव इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष राकेश बावेजा, उपाध्यक्ष वार्नर प्लॉनर, सचिव आर.डी.चौधरी,रांजणगावचे सरपंच सर्जेराव खेडकर, उद्योजक दत्तात्रय पाचुंदकर,अमोल जगताप, बापू शिंदे आदिसह उद्योजक उपस्थित होते.

यावेळी बोलताना देसाई म्हणाले की, पुणे जिल्ह्यात रांजणगाव औद्योगिक वसाहती( MIDC) सह चाकण व तळेगाव दाभाडे येथील औद्योगिक वसाहती मधील कामगारांकरिता कामगार विमा योजना मंडळाचे (एएसआय )सुसज्ज रुग्णालये तात्काळ उभारण्यात येणार असून, यामुळे कामगारांसह स्थानिक नागरिकांना याचा लाभ होईल. रांजणगाव एमआयडीसीमुळे राज्य शासनाच्या उत्त्पन्नात मोठी भर पडत असून,कोरोना काळात बंद असलेले राज्यातील उद्योगधंदे हे पुन्हा शंभर टक्के पूर्ववत झाले असून,एमआयडीसीत स्थानिक तरुणांना ८0 टक्के  रोजगार न देणाऱ्या कारखानदारावर त्यांना देण्यात येणाऱ्या परताव्यात कपात करण्याचा इशारा देसाई यांनी दिला.

रांजणगाव औद्योगिक वसाहतीची मुहूर्तमेढ १९९१ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या दूरदृष्टीपणामुळे रोवली गेल्याने शिरुर तालुक्यात मागील काही वर्षात आर्थिक सुबत्ता मोठया प्रमाणात आल्याचे कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगत अष्टविनायक रांजणगाव गणपती देवस्थानच्या ९६ एकर क्षेत्रावर अध्ययावत सुसज्ज हॉस्पिटल उभारण्याचा मानस असून, लवकरच त्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले.