Pune News : तक्रारीवर पुन्हा सुनावणी घेत ‘महारेरा’ने निर्णय ठेवला कायम; बिल्डरला सुनावला होता 1 कोटी 30 हजाराचा दंड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सदनिकेचा ताबा वेळेत न दिल्याप्रकरणी तसेच जागेचा मोबदला दिला नसल्याच्या दाव्यात महारेराना एकतर्फी आदेश दिल्याने अपिलेट अँथोरिटीकडे गेल्यानंतर तक्रारीची पुन्हा सुनावणी होऊन याबाबत पूर्वी दिलेला निकाल महारेराने कायम ठेवला आहे.

येमुल व संचेती असोसिएटस विरोधात हा निकाल झाला आहे. महारेराच्या अँडजुडिटींग अँथॉरिटीने एक कोटी ३० हजार दंड ठोठावला आहे. तसेच ७७ वर्षाच्या ज्येष्ठ तक्रारदाराला २५ हजार कायदेशीर खर्च देणे आणि दंडाची पूर्ण रक्कम नऊ टक्के व्याजासह ६० दिवसाच्या आत देण्याचे आदेश देण्यात आला आहे. याबाबत हडपसर येथील जागा संबंधित बिल्डरला मूळ मालक ज्ञानेश्वर भुसारी व इतरांनी विकसनासाठी दिली होती. या जागेवर एक निवासी गृहप्रकल्प उभारण्यात येत आहे. त्या बदल्यात जागा मालकाला तीन कोटी ७५ लाख रुपये देण्याचे ठरले होते. यापैकी फक्त २५ लाख रुपयांची रक्कम भुसारी यांना देण्यात आली. तर बिल्डरांने उरलेल्या रकमेचा तीन कोटी ५० लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.

मात्र संबंधित रक्कम देण्यास शक्य नसल्याने बिल्डरने तक्रारदार यांना दुस-या योजनेत सदनिका देण्याचे आश्‍वासन दिले. त्यानुसार डिसेंबर २०१३ मध्ये नोंदणीकृत दस्त करण्यात आला होता. या सदनिकेची किंमत दस्तप्रमाणे एक कोटी ठरविण्यात आली होती. ही रक्कम उरलेल्या तीन कोटी ५० लाख रुपयांच्या रकमेतून वजा करण्याचे ठरले होते. दस्ताप्रमाणे सदनिकेचा ताबा मार्च २०१५ मध्ये देण्याचे ठरले होते. मात्र सदनिका विकसकांना देता आली नाही. या दरम्यान ज्ञानेश्वर भुसारी यांचा मृत्यू झाला. सदनिका ताब्यात देण्याबाबत मंजूषा भुसारी यांनी वारंवार विचारणा केली.

मात्र बिल्डरने सदनिका देण्यास नकार दिला. शेवटी या ७७ वर्षीय मंजूषा भुसारी यांनी खटला दाखल केला. त्यानंतर हे प्रकरण रेराकडे गेले होते. २०१९ मध्ये बिल्डर विरोधात एकतर्फी आदेश देण्यात आला होता. त्यामुळे बिल्डरने रेराच्या अपिलेट अँथोरिटीकडे अपील दाखल केले. अपीलचा आदेश
जुलैमध्ये आला. या अँथोरिटीने अपील महारेरा अँडजुडिटींग अँथॉरिटीकडे चालवावे असा आदेश दिला. दोन्ही पक्षकाराने आपली बाजू मांडल्यानंतर महारेरा अँडजुडिटींग अँथॉरिटीने संपूर्ण रक्कम नऊ टक्के व्याजासह देण्यास सांगितले आहे. मंजूषा भुसारी यांच्या वतीने ॲड. वीरेंद्र महाडिक व ॲड सुरभी मेहता यांनी काम पाहिले.