Pune News : एकाच दिवसांतील ‘कोरोना’ रुग्णांचा उच्चांक ! 2587 रुग्ण आढळल्याने पुण्यात दुसरी लाट आल्याची शक्यता; PMP सेवा बंद करण्यासोबतच अन्य कडक निर्बंध लादण्याच्या तयारीत प्रशासन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील एका दिवसांतील कोरोना बाधितांच्या संख्येचा उच्चांक झाला आहे. चोवीस तासांत तब्बल २ हजार ५८७ नवीन रुग्ण आढळले आहेत. मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या दीड हजारांच्यावरच राहीली असून पुण्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यापार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासन कडक निर्बंध लावण्याची तयारी करत असून येत्या एक दोन दिवसांत ‘पीएमपी’ सेवा बंद ठेवण्यासोबतच आणखी कठोर पावले उचलली जाण्याची शक्यता आहे.

शहरातील पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या १५ हजार ३२ झाली असून मागील चोवीस तासांत पुण्यातील ११ रुग्णांसह १६ जणांचा मृत्यू झाला आहे. बरोबर एक वर्षापुर्वी शहरात कोरोनाची साथ सुरू झाली. राज्य शासनाने मागीलवर्षी १७ मार्चपासून शहरातील शाळा, महाविद्यालये बंद करण्यापासून संचारबंदी लागू केली होती. याच दरम्यान देशातील विशेषत: मोठ्या शहरातही कोरोना वेगाने हातपाय पसरत असल्याने २२ मार्चला जनता कर्फ्यू तर २५ मार्चपासून लॉकडाउन जाहीर करण्यात आले होते. ऑगस्ट- सप्टेंबरपर्यंत शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येने भयावय आकडा गाठला होता. शहरातील ऍक्टीव्ह रुग्ण १९ हजारांच्या पुढे पोहोचले होते. तर मृत्यूदरही अडीच टक्क्यांच्या पुढे गेला होता. मात्र, ऑक्टोबरनंतर अगदी आताच्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ऍक्टीव्ह रुग्णसंख्या अगदी चौदाशे पर्यंत खाली आली होती.

फेब्रुवारीच्या दुसर्‍या आठवड्यानंतर दररोज २०० च्या पुढे नवीन रुग्ण आढळून येउ लागले. तर अवघ्या सव्वा महिन्यांत ही संख्या अडीच हजारांच्या पुढे गेले आहे. रुग्णवाढीचा दर २५ टक्क्यांच्या पुढे गेल्याने चिंतेत भर पडली आहे. रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी, ३१ मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक संस्था बंद, ५० जणांच्या उपस्थितीत लग्न समारंभ पोलिस परवानगीने तर अंत्यसंस्कारास २० लोकांची उपस्थितीचे बंधन घालण्यात आले आहे. पीएमपीने देखिल ५० टक्के प्रवाशांनाच मुभा दिली आहे. परंतू यानंतरही रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. टप्प्याटप्प्याने उद्याने आणि पीएमपी सेवा बंद ठेवण्यासोबतच सार्वजनिक ठिकाणी विनाकारण फिरणार्‍यांवर कठोर कारवाईसाठी प्रशासन आग्रही झाले आहे. याची अंमलबजावणी येत्या एक दोन दिवसांत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, आतापर्यंत शहरातील रुग्णसंख्या २ लाख २३ हजार ७९७ झाली असून २ लाख ३ हजार ७८५ रुग्ण बरेही झाले आहेत. तर ४ हजार ९८० जणांचा मृत्यू झाला आहे. मागील चोवीस तासांत तब्बल ११ हजार २३० संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. चोवीस तासांत सर्वाधीक चाचण्यांचा विक्रमही यानिमित्ताने झाला आहे. कोरोना चाचण्यांसोबतच कॉन्टक्ट ट्रेसिंग वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. लसीकरणाचा वेग वाढावावा अशी मागणी केंद्र आणि राज्य शासनाकडे करण्यात आली असून दररोज ५० हजार नागरिकांना लस देता येईल, अशी यंत्रणा उभारण्यासाठी सध्याच्या लसीकरणाचे नियम शिथिल करावेत, अशी मागणी करण्यात आल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.