Pune News : न्यायालयीन कामकाज सोमवारपासून पूर्ववत ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या नऊ महिन्यांपासून महत्त्वाच्या आणि तत्काळ प्रकरणांवरच सुनावणी होत असल्याने न्याय मिळण्यास उशीर झालेले पक्षकार आणि आर्थिक संकटात सापडलेले वकील यांना लवकरच दिलासा मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. येत्या सोमवारपासून (ता.11) नियमित कामकाज सुरू होण्याची शक्‍यता आहे.

उच्च न्यायालय आणि बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ऍण्ड गोवाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज मुंबईत पार पडली. त्यात झालेल्या चर्चेत नियमित कामकाजाबाबत उच्च न्यायालयाने सकारात्मकता दर्शवली आहे. मुंबईत झालेल्या बैठकीस उच्च न्यायालयातील न्यायाधीश, पदाधिकारी, बार कौन्सिलचे उपाध्यक्ष ऍड. सुदीप पासबोला, माजी अध्यक्ष ऍड. सुभाष घाडगे, ऍड. विठ्ठल कोंडे-देशमुख सदस्य ऍड. राजेंद्र उमाप, ऍड. उदय वाळुंजीकर आणि मुंबई बार असोसिएशनचे अध्यक्ष व सचिव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. ऑक्‍टोबरमध्ये लॉकडाऊनचे अनेक नियम शिथिल करण्यात आल्यानंतर न्यायालये पूर्ववत सुरू होतील, अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र तेव्हापासून नियमित सुनावणीबाबत तारीख पे तारीख सुरू आहे. पण आता याबाबत पुढील दोन ते तीन दिवसांत अंतिम निर्णय होऊन कामकाजाची कार्यपद्धती असलेली एसओपी जाहीर होऊ शकते.

ज्या जिल्ह्यात अद्याप पूर्णपणे कामकाज सुरू झालेले नाही, तेथील कोरोनाच्या स्थितीचा आढावा बैठकीत घेण्यात आला. तसेच न्यायालयीन कामकाजातील अडचणी समजून घेत त्या दूर करण्यासाठी काय करता येईल यावर चर्चा झाली. पुण्यातील कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. येथील कामकाज नियमित सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळे सोमवारपासून (ता.11) नियमित कामकाज सुरू होऊ शकते.
ऍड. राजेंद्र उमाप, सदस्य, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ऍण्ड गोवा