Pune News : ‘कोव्हिशिल्ड’ ट्रेडमार्कबाबतचा अर्ज न्यायालयाने फेटाळला, ‘सिरम’ आणि नांदेड येथील ‘क्‍युटीस बायोटीक’ कंपनीतील वाद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  ‘सिरम’ बनवत असलेल्या ‘कोव्हिशिल्ड’ या लशीच्या ट्रेडमार्क वापरावर हरकत घेत नांदेड येथील ‘क्‍युटीस बायोटीक’ या कंपनीने येथील न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यातील अर्ज न्यायालयाने शनिवारी फेटाळला. ‘सिरमे’ ने ‘कोव्हिशिल्ड’ नावाचा वापर थांबविण्याबाबत तात्पुरता मनाई आदेश देण्याची मागणी करणारा अर्ज या कंपनीने केला होता.

सत्र न्यायाधीश ए. व्ही. रोट्टे यांच्या न्यायालयाने संबंधित अर्ज फेटाळला. ‘कोव्हिशिल्ड’ या ट्रेडमार्कचा वापर करण्यास आम्ही ‘सिरम’च्या आधी सुरवात केली आहे. त्यामुळे ‘सिरम’ने लशीचे नाव बदलावे, अशी मागणी करणारा दावा क्‍युटीस बायोटीक’ कंपनीने येथील जिल्हा न्यायालयात केला आहे. सिरमच्यावतीने ॲड. सुनीता किणकर, ॲड. हितेश जैन, ॲड. श्रीकांत देशपांडे, ॲड. पूजा तिडके यांनी बाजू मांडली.

क्‍युटीस बायोटीकला प्रथमदर्शनी हक्क शाबीत करता आला नाही. बिलाच्या दोन पावत्या आणि नोंदणीसाठी आधी अर्ज केला म्हणून ट्रेडमार्कखाली हक्क मिळत नाहीत. अर्जदार यांनी अद्याप लस तयार केलेली नाही. त्यामुळे लशीच्या नावावरून ग्राहकांमध्ये कोणताही गोंधळ होणार नाही. तसेच पासिंग ऑफचे उल्लंघन होणार नाही. नावाचा वापर थांबविल्यास ‘सिरम’चे मोठे नुकसान होणार आहे. कारण केंद्र सरकारसह काही देशांनी लस घेतली आहे, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

याबाबत सिरमचे वकील ॲड. एस. के. जैन यांनी सांगितले की, अर्जदार यांनी डिसेंबर २०२० मध्ये लशीच्या नावाच्या नोंदणीबाबत केलेल्या अर्जाची माहिती लपवून ठेवली, असे करणे म्हणजे न्यायालयाची दिशाभूल केल्यासारखे असल्याचे निकालात नमूद आहे. सॅनिटायझर आणि इतर उत्पादनांबाबत अर्ज केला किंवा त्याचे उत्पादन सुरू केले म्हणून त्या नावाचे एकाकी सर्वाधिकार मिळत नाहीत. याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या दोन निकालांचा संदर्भ आम्ही दिला होता.