Pune News : 45 कोटी रूपयांच्या GST अपहार प्रकरणातील सूत्रधाराचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – व्यवसाय करीत असताना 45 कोटी रुपयांच्या जीएसटीचा अपहार केल्याप्रकरणी व्यावसायिक सागर सूरज अगरवाल याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. हा गंभीर आर्थिक गुन्हा आहे, असे निष्कर्ष नोंदवून न्यायालयाने जामीन नाकारला.

जीएसटी खात्याच्यावतीने विशेष सरकारी वकील ऍड. संदीप घाटे यांनी आरोपीस जामीन देण्यास विरोध केला. सदर गुन्हा हा आरोपीने केला नाही. आरोपीचा या गुन्ह्याशी संबंध नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वकिलांनी केला. मात्र न्यायालयाने तो अमान्य केला.

ऍड. घाटे यांनी आरोपीने दाखल केलेल्या जामीन अर्जास हरकत घेऊन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाड्यांचे दाखले दिले. जीएसटी आयुक्तांना अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये आरोपींना अटक करण्यासाठी आदेश करण्याचे पूर्ण अधिकार आहेत, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच अटक करण्यापूर्वी मूल्यांकन करण्याची आवश्‍यकता नाही.

सदरील गुन्हा हा देशाची आर्थिक परिस्थिती खिळखिळी करणारी असून अशा गंभीर आर्थिक गुन्ह्यामध्ये जामीन देण्यात येऊ नये, असा युक्तिवाद ऍड. घाटे यांनी केला. जीएसटी खात्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गुप्तचर अधिकारी जेरी परेरा, मोनिका वर्मा व अधीक्षक शिव मंगल सिंग यांनी आरोपीस अटक केली होती.