Pune News : नव्याने समाविष्ट ३४ गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका निर्माण करा – पतित पावन संघटनेची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महानगरपालिका हद्दीत नव्याने ३४ गावांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु पेठ भागातील विकासकामांनाच अंदाजपत्रकातील निधी अपुरा पडत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा परिस्थितीत ३४ गावांचा विकास कसा साध्य होईल अशी साशंकता आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने व राज्य शासनाने या गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका निर्माण करावी, अशी मागणी पतित पावन संघटना, पुणे शहर च्या वतीने करण्यात आली आहे. या सबंधित निवेदन पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना देण्यात आले आहे.

यावेळी पुणे शहराचे स्वप्नील नाईक, धनंजय क्षीरसागर, विजय गावड़े, संतोष शेंडगे, गुरु कोळी व अक्षय नाईक उपस्थित होते. संबंधित अधिकारी, मुख्यमंत्री, नगरविकासमंत्री व पुणे महानगरपालिकेचे नेते यांना पत्राद्वारे मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यात क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनाने पुणे महानगरपालिका ही सर्वात मोठी महानगरपालिका आहे. परंतु आर्थिकदृष्ट्या अन्य महानगरपालिका जेवढ्या सक्षम आहेत व त्यांचे विकासकाम आर्थिकदृष्टीने पाहिल्यास पुणे महानगरपालिका योग्यरीत्या सक्षम नसल्याचे दिसून येते.

स्वप्नील नाईक म्हणाले, शहराच्या उपनगरातील वस्तींमध्ये विकासकामांसाठी अपुरा पडणारा निधी, पुणे मनपाचे कर थकविलेले थकबाकीदार तसेच या वर्षातील कोरोना लॉकडाऊनमुळे व्यावसायिक व नोकरदार वर्ग यांच्यावर आलेले संकट हे सर्व पाहता यावर्षीच्या अंदाजपत्रकावरील भार पुणेकरांना सोसावा लागेल. त्यामुळे पुणेकरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या सर्व बाबी लक्षात घेता पालिका प्रशासनाने व राज्य शासनाने या ३४ गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका निर्माण करावी अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली.