Pune News : घरफोडया करणार्‍या तिघांना गुन्हे शाखेकडून अटक, 9.25 लाखाचा माल जप्त

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरात विविध भागात टेहळणी करून बंद असणारे फ्लॅट बनावट चावी अन कटवणीने फोडणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून सव्वा नऊ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

विकास सुनील घोडके (वय 24), कुलदीप तानाजी शिंदे (वय 27, रा. वडगाव शेरी) व अजय सतीश दुशिंग (वय चिखली) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद घातला आहे. काही केल्या या घटना थांबत नसल्याचे दिसत आहे. पोलीस गस्त घालत आहेत आणि गुन्हे शाखेचे पथक या गुन्हेगाराचा शोध घेत आहेत. यावेळी युनिट दोनचे पथक हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी कर्मचारी अजित फरांदे यांना बतमीदारामार्फत माहिती मिळाली की, दोघे कात्रज तलाव येथे घरफोड्या करण्यासाठी येणार आहेत. त्यानुसार गुन्हे शाखेचे उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक महेंद्र जगताप, उपनिरीक्षक आनंदराव पिंगळे, अजित फरांदे, कादिर शेख, चेतन गोरे, संजय जाधव, गोपाल मदने, किशोर विग्गु, समीर पटेल, चंद्रकांत महाजन तसेच पथकातील कर्मचाऱ्यांनी सापळा रचून दोघांना पकडले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी घरफोड्या केल्याची माहिती दिली. त्यांना अटक करत सखोल तपास केला असता त्यानी साथीदार अजय दुशिंग यांच्यासोबत घरफोड्या केल्याची माहिती दिली. त्याला देखील अटक केली. त्यांच्याकडून सोने-चांदीचे दागिने व इतर ऐवज असा एकूण 9 लाख 987 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. सुनील घोडके हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर 51गुन्हे दाखल आहेत. तर अजय याच्यावर 5 आणि कुलदीप शिंदेवर 1 गुन्हा दाखल आहे.