Pune News : पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या 5 जणांच्या टोळीला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या पाच जणांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कम, कोयते, 5 मोबाईल व दुचाकी असा 5 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

निखिल दत्ता थोरात (वय 24), रवी ज्ञानेश्वर बोत्रे (वय 24), किरण ज्ञानेश्वर बोत्रे (वय 22), अविनाश राजेंद्र कांबळे (वय 22) आणि राहुल म्हसू शिंदे (वय 24) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

शहरातील सराईत व पाहिजे आरोपींची माहिती काढली जात आहे. यादरम्यान गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार अजय थोरात यांना मंगळवार पेठेतील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी काही इसम येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून मंगळवार पेठे परिसरातील एका वॉटर टँकरच्या आडबाजूला जमलेल्या पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता दोन कोयते आणि पाच मोबाईल असा मुद्देमाल सापडला.

अटक केलेले आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरोधात चतु:शृंगी, चंदनगर, भारती विद्यापीठ, कोथरुड, उत्तमनगर, हिंजवडी, परांडा, नळदुर्ग, या पोलीस ठाण्यात घरफोडी, चोरी, जबरी चोरी, मारामारी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. निखिल दत्ता थोरात आणि किरण ज्ञानेश्वर धोत्रे हे दोन आरोपी हिंजवडी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका घरफोडीच्या गुन्ह्यात 2019 पासून फरार असल्याचेही निष्पन्न झाले आहे.

त्यांच्याकडे केलेला अधिक चौकशीत त्यांनी फरासखाना, लोणीकंद, हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून चार एलसीडी, लॅपटॉप, इस्त्री, बूट रोख रक्कम असा एकूण 4 लाख 82 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या सर्वांविरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड करीत आहेत.

ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक सुनील ताकवले, उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनील कुलकर्णी, पोलीस कर्मचारी अजय थोरात, इमरान शेख, अय्याज दड्डीकर, शशिकांत दरेकर, प्रशांत गायकवाड, तुषार माळवदकर, महेश बामगुडे, सतीश भालेकर, अशोक माने, योगेश जगताप, सचिन जाधव, दत्ता सोनवणे यांच्या पथकाने केली.