Pune News : गणेश पेठेत भररस्त्यामध्ये तलवारीने केक कापत वाढदिवस साजरा; गुन्हे शाखेकडून एकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मध्यवस्तीमधील गणेश पेठ परिसरात भररस्त्यात तलवारीने केक कापत वाढदिवस साजरा करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. गुन्हे शाखेने हा प्रकार उघडकीस आणत एकाला अटक केली आहे. समीर अनंत ढमाले (वय २७, रा. लोणकर वाडा, गणेश पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

शहरात रस्त्यावर केक कापून वाढदिवस साजरा करण्याचे फॅड मोठ्या प्रमाणात आहे. त्यातही कॉलेज तरुण-तरुणी गल्यागल्यात वाढदिवस साजरा करतात. तर गल्लीतील भाई देखील धुमधडाक्यात वाढदिवस साजरा करत एकप्रकारे शक्ती प्रदर्शन देखील केले जाते. यामुळे पोलीस सध्या हे प्रकार हाणून पाडत आहेत.

दरम्यान समीर ढमाले याने गणेश पेठेत भररस्त्यात तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केला असल्याची माहिती हवालदार अजय थोरात यांना मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने ढमालेला गणेश पेठ भागातून अटक केली. त्याच्याकडून तलवार जप्त केली. उपनिरीक्षक संजय गायकवाड, अजय थोरात, महेश बामगुडे यांनी ही कारवाई केली. गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईमुळे वाढदिवस साजरा करणाऱ्यांना जरब बसेल.