Pune News : येरवडा जेलच्या समोरच ‘भाईचा बड्डे’ साजरा करण्यासाठी अतिषबाजी करणारे सराईत गुन्हेगार गुन्हे शाखेकडून अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – येरवडा कारागृहात असलेला सराईत गुन्हेगार आकाश कंचिले यांचा ५ फेब्रुवारी रोजी येरवडा कारागृहाबाहेर वाढदिवस साजरा करणार्‍या तसेच खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात फरारी असलेल्या गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट ४ ने अटक केली.

मधुकर बाराते ऊर्फ चोर पंजा (वय २०, रा. नवी खडकी, येरवडा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. चोर पंजा याने अल्पवयीन मुलाच्या मदतीने २६ जानेवारी रोजी येरवड्यातील भाजी मार्केट येथे हातात कोयते घेऊन परिसरात दहशत निर्माण केली. तेथे एका तरुणावर कोयत्याने मारहाण करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्या गुन्ह्यात फरार असताना त्याने व त्याच्या साथीदारांनी ५ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री येरवडा कारागृहाबाहेर आकाश कंचिले याचा वाढदिवस फटाके वाजवून साजरा केला होता. याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले होते. वाढदिवस साजरा करण्याच्या प्रकारात येरवडा पोलिसांनी ऋषिकेश माने व तुषार आवटे या दोघांना अटक केली होती.

या गुन्ह्यांचा समांतर तपास युनिट ४ चे पथक करीत होते. पोलीस अंमलदार रुपेश वाघमारे, नागेश कुंवर व रमेश राठोड यांना फरारी आरोपी काळेवाडी स्मशान भूमी येथे येणार असल्याची माहिती मिळाली. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक रजनिश निर्मल यांनी योग्य सुचना करुन टीम तयार केली.

यादरम्यान काळेवाडी स्मशान भूमी येथे पोलीस पथकाने चोर पंजा याला ताब्यात घेतले. दोनही गुन्ह्यातील पुढील कारवाईसाठी त्याला येरवडा पोलिसांच्या ताब्यात दिले.

ही कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट ४ चे पोलीस निरीक्षक रजनिश निर्मल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप जमदाडे, उपनिरीक्षक शशिकांत शिंदे, सहायक फौजदार शंकर पाटील, पोलीस अंमलदार रुपेश वाघमारे, नागेश कुंवर, राजस शेख, दीपक भुजबळे, विशाल शिर्के, प्रविण कराळे, रमेश राठोड, दत्ता फुलसुंदर, कोस्तुभ जाधव व अक्षता विसापुरे यांनी ही कामगिरी केली.