Pune News : गुन्हे शाखेकडून येरवडा, समर्थ व खडकी परिसरातील मांजाची विक्री करणार्‍या विक्रेत्यांवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  शहरात बेकायदेशीर चायनीज नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर पुणे पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने येरवडा, समर्थ व खडकी परिसरात मांजा विक्री करणाऱ्या दोघा विक्रेत्यांवर कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत.
अशरफ आदीफ तांबोळी (रा. जुना बाजार, खडकी) आणि नाजनीन अमीन पटेल (रा. येरवडा) हे दोघे चायनीज मांजा विक्री करताना आढळले. त्यांच्यावर पर्यावरण संरक्षण अधिनियम नुसार गुन्हे दाखल केले आहेत.

शहरात गेल्या दोन वर्षात चायनीज मांजाने अनेक पक्षी मृत्य झाले आहेत. तर दोन घटनांत एका डॉक्टर व एका महिलेचा देखील गंभीररित्या जखमी होऊन मृत्यू झाला आहे. त्यामुळे नायलॉन मांजा विक्रीवर पोलिसांनी बंदी घातली आहे. मात्र, असे असताना अनेकजण चायनीज मांजा विक्री करत आहेत. अशा विक्रेत्यावर पोलिसांनी आता धडक कारवाईला सुरुवात केली आहे.

गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकातील सचिन ढवळे व विशाल शिर्के यांना येरवडा येथील अशरफ हा मांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार याठिकाणी पोलिसांनी कारवाई केली. तर खडकीत नाजनीन पटेल याला पकडले आहे.

यासोबतच खंडणी विरोधी पथकातील प्रदीप शितोळे यांना माहिती मिळाली की, समर्थ परिसरात अयाज शेख (वय 55) हा चायनीज मांजाची विक्री करत आहे. नुसार याठिकाणी कारवाई करत शेख याला पकडण्यात आले आहे.

ही कारवाई सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, उपनिरीक्षक विजय झंझाड़, प्रदीप शितोळे, शैलेश सुर्वे, सुरेंद्र जगदाळे, सचिन अहिवळे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

काही वर्षपासून पुण्यात पतंग उडविण्यासाठी चायनीज नायलॉन मांजाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. तुटलेला हा चायनीज मांजा रस्त्यात तसेच झाडांना अडकून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना व पक्षांना त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे न्यायालयाने व राज्य शासनाने माझ्या विक्रीवर बंदी घातली आहे. त्यामुळे नायलॉन मांजाचा वापर नागरिकांनी करू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.