Pune News : पुण्यात सर्वात मोठया जुगार अड्डयावर गुन्हे शाखेकडून छापा, 63 जणांना पकडलं; लष्करच्या ‘राजू’चा आशिर्वाद असल्याची चर्चा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  ‘अवैध धंदे बंद’साठी पोलीस आयुक्त आग्रही असताना स्थानिक पोलीस मात्र त्याकडे लक्ष न देता आपल्या हद्दीत सोयीस्कररित्या चांगला ‘खेळ’ चालवत असल्याचे दिसत असून, लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सागर खरेंच्या तब्बल 4 मजली इमारतीत सुरू असलेल्या जुगार अड्डयावर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारला आहे. विशेष म्हणजे यात 63 जणांना पकडले गेले आहे. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, नुकतीच खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशीच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई केली होती. आता दुसरी कारवाई असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच कसे धंदे दिसतात असा प्रश्न निर्माण झाला आहे.

याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, लष्कर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या ‘राजू’च्या आशिर्वादामुळे हद्दीत राजरोसपणे अवैध धंद्ये चालू असल्याची चर्चा सध्या पोलिस वर्तुळामध्ये आहे. थेट पोलिस आयुक्तांनी अवैध धंद्यांवर कारवाईचे आदेश दिले असताना देखील पोलिस ठाण्यातील राजूसारखे अनेकजण ‘वण’-‘वण’ करत ‘सोन’ जमा करत असताना पहावयास मिळत आहे. अलिकडेच खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीत देखील ‘नंदु’कुमाराच्या फुललेल्या बाजारावर वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी छापा टाकून मोठी कारवाई केली. मात्र, तोच ‘नंदु’ आम्ही चिचुके वाटत नाही तर पैसे वाटतो अशी भरचौकात भाषा करीत असल्याचे काही पोलिस कर्मचारी सांगतात. त्यामुळे अवैध धंदे चालविणार्‍यांना भरचौकात मोठ-मोठं आभाळा एवढं बोलण्याचं ‘बळ’ कोण देतं की पैसा टाकून ‘बळ’ विकत मिळतं अशी चर्चा सध्या पोलिस वर्तुळामध्ये मोठा प्रमाणावर आहे. दरम्यान, शहरात चालू असलेल्या प्रत्येक घडामोडी जिल्हयाचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहचवली जात असल्याची देखील सध्या जोरदार चर्चा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरात अवैध धंदे बंद करा असे स्पष्ट आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले आहेत. त्यावर गुन्हे शाखा नजर ठेवून आहे. नजरेत ‘भरताच’ कारवाई देखील होत आहे. दरम्यान गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांना लष्कर पोलीस ठाण्याच्या परिसरात एका इमारतीत जुगार सुरू असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानंतर त्यांनी या माहितीची खातरजमा केली. त्यावेळी चार मजली इमारतीत फुल तेजीत जुगार सुरू असल्याचे दिसून आले. यानुसार मोराळे व उपायुक्त बच्चन सिंह यांनी गुन्हे शाखेच्या युनिट एक आणि दोन च्या पथकांना या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने आज काही वेळापूर्वी छापा टाकला. त्यावेळी येथून 63 जणांना पकडले असून, पावणे दोन लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

कारवाई सुरू असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.
मात्र या कारवाईने चांगलीच खळबळ उडाली असून, धंदेवाले अन वसुली वाले यांच्यात देखील भितीचे वातावरण आहे. नुकतीच खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई झाली होती. आता ही दुसरी कारवाई आहे. त्यामुळे उलट सुलट चर्चा सुरू आहे