Pune News : रिक्षाचालकाकडून पोलिस कर्मचार्‍यास मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  विनामास्क रिक्षा चालकाला अडविल्यानंतर त्याला दंडाची पावती करण्यास सांगितल्याच्या रागातून त्याने पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी रिक्षाचालक अल्ताफ शेख (वय ४७,रा. येरवडा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार तानाजी शिवाजी आडके यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तानाजी आडके पुणे स्टेशन परिसरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करत होते. त्यावेळी रिक्षाचालक शेख तोंडाला मास्क न लावता प्रवाशांची ने-आण करण्यासाठी ओरडत होता. त्यावेळी तानाजी यांनी त्याला मास्कची विचारणा केली. त्यानंतर तडजोड शुल्काची पावती करण्यास सांगितले. मात्र आरोपी शेखने दंडात्मक पावती करण्यास नकार देत तानाजी आडके यांच्यासोबत वाद घातला. तर त्यांना पोटात ठोसा मारून धक्का देत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. अधिक तपास उपनिरीक्षक फड हे करत आहेत.