Pune News : स्पा सेंटरच्या नावाखाली भलताच ‘उद्योग’; दोघांना कोठडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरेगाव पार्कमधील “स्काय इन स्पा’ या स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्‍या व्यवसाय चालविल्याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी एका महिलेसह दोघांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांची 29 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.

नूतन अमोल धवन ( रा. वॉर्ड नंबर दोन, केशवनगर) आणि रवी बलभीम जमादार (वय 25, रा. बुद्ध विहाराच्या मागे, पंचशीलनगर, घोरपडी) यांनी कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक मीरा त्र्यंबके यांनी फिर्याद दिली आहे. या स्पावर बुधवारी (ता. 23) कारवाई करीत तेथून सात महिलांची सुटका करण्यात आली. यातील दोन महिला या परराज्यातील आहेत. संबंधित स्पा सेंटर हे नूतन चालवत आहे. तर त्या ठिकाणी येथील व्यवस्थापक रवी याच्यामार्फत महिलांकडून वेश्‍याव्यवसाय करून घेतला जात होता, असे फिर्यादीत नमूद आहे.

वेश्‍या व्यवसाय करून घेण्यासाठी आरोपींना या महिला कोणामार्फत मिळवल्या ? आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहेत का? महिलांकडून वेश्‍याव्यवसाय करून घेत त्यांनी किती पैसे कमावले? त्यांनी आणखी काही महिला वेश्‍या व्यवसाय करण्यासाठी मिळवल्या आहेत का ? याची चौकशी करण्यासाठी त्यांना पोलिस कोठडी सुनाविण्याचा युक्तिवाद सरकारी वकील नितीन कोंघे यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने आरोपींची 29 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.