Pune News : ‘सिरम’वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा – संभाजी ब्रिगेड

पुणे : पुण्यात मांजरी या ठिकाणी सिरम इन्सिट्युटची नवीन इमारत आहे. या ठिकाणी काल दुपारी इमारतीला भीषण आग लागली. पुण्यात सध्या कोरोना महामारीच्या कोव्हीशिल्ड लसीची निर्मिती करण्याचे काम सिरम इन्सिट्युट च्या माध्यमातून केले जाते. सिरम इन्सिट्युट च्या हलगर्जीपणामुळे इमारतीला आग लागली असताना अग्रीशामक दलाच्या जवानानी जीवाची पर्वा न करता आग रोखण्याचा प्रयत्न केला. त्या कालावधीत आग भडकल्यामुळे जीवीत हानी झाली असून त्यामध्ये ५ कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये युपी बिहार मधून आलेल्या कामगारांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला आहे. त्यामध्ये मरण पावलेल्या कामगारांमध्ये रामा शंकर हरीजन, बिपीन सरोज, उत्तर प्रदेश, सुशीलकुमार पांडे बिहार, महेंद्र इंगळे व प्रतिक पाष्ठे रा. पुणे यांचा मृत्यू झाला असून सदर प्रकरणाचा पोलीस तपास करुन दोषींवर त्वरीत कडक कारवाई करण्यात यावी. अशी मागणी संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा व पुणे शहर द्वारे करण्यात आली आहे. यावेळी पुणे शहर अध्यक्ष उत्तम कामठे, सहकोषाध्यक्ष विवेक तुपे, उपाध्यक्ष अतुल येवले, निलेश काळे व मारुती काळे आदी उपस्थित होते.

तसेच संबंधित सिरम इन्सिट्युट वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, येत्या आठ दिवसाच्या आत जर संबंधित सिरम इन्सिट्युट वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला नाही तर संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा व पुणे शहरच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिला गेला आहे.