Pune News : दागिने चोरणाऱ्या, घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरट्याला स्वारगेट पोलिसांकडून अटक, 4 गुन्हे उघडकीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   शहरात गर्दी असणाऱ्या ठिकाणी उभा राहत नागरिकांचे दागिने चोरणाऱ्या तसेच घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरट्याला स्वारगेट पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून 4 गुन्हे उघडकीस आणत पावणे तीन लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

सर्फराज इकबाल मोमीन (वय 22, रा. सय्यदनगर, गल्ली नं. 12, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

शहरात वाढत्या घरफोड्या आणि चोरीच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गस्त वाढवत सराईत गुन्हेगाराची माहिती काढून त्यांना पकडण्याच्या सूचना दिल्या आहेत. यादरम्यान स्वारगेट पोलीस हद्दीत गस्त घालत होते. तर सराईत गुन्हेगाराची माहिती काढली जात होती. त्यावेळी पोलीस हवालदार सचिन कदम व ज्ञाना बडे यांना बतमीदारामर्फत माहिती मिळाली की सराईत गुन्हेगार सर्फराज हा नटराज हॉटेलजवळ थांबला आहे. त्यानुसार पोलीस उपायुक्त सागर पाटील व वरिष्ठ निरीक्षक बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली
सहाय्यक निरीक्षक अमोल रसाळ, उपनिरीक्षक सुरेश जायभाय, पथकातील मनोज भोकरे, सचिन दळवी, सोमनाथ कांबळे, संदिप साळवे, लखन ढावरे, वैभव शितकाल, शंकर गायकवाड, ऋषिकेश तिटमे यांच्या पथकाने त्याला सापळा रचून पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून 4 गुन्हे उघडकीस आणत 2 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.