Pune News : पॅरोलवर सुटलेल्या सराईत गुन्हेगाराकडून 16 वर्षीय मुलीचा विनयभंग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येरवडा कारागृहातून (Yerawada Jail) पॅरोलवर सुटलेल्या एका सराईत गुन्हेगाराने 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग (Rape) केल्याची घटना समोर आली आहे. लोणीकाळभोर (Loni Kalbhor) परिसरात ही घटना घडली आहे.

सचिन सुभाष कदम (वय 45) असे या सराईत गुन्हेगार याचे नाव आहे. पीडित मुलीच्या नातेवाईकाने तक्रार दिली आहे. त्यानुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी घरात एकटीच होती. यावेळी आरोपीने घरात प्रवेश करत तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपीने तिचे तोंड दाबून जीवे मारण्याची धमकी दिली. तरीही पीडित मुलीने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भिऊन आरोपीने घराबाहेर पळ काढला. दरम्यान आरोपी निघून गेल्याची खात्री होताच पीडित मुलीने आपल्या कुटुंबीयांना फोन करून घटनेची माहिती दिली. कुटुंबीयांनीही तातडीने पोलीस ठाणे गाठत सचिन कदम यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप बोरकर करीत आहेत.