Pune News : शिर्डीतील खून प्रकरणातील आरोपीचे पुण्यातील ससून हॉस्पिटलमधून पलायन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिर्डी येथील खून प्रकरणात अटकेत असणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला उपचार करण्यासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याने पहाटे पलायन केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

समीर अक्रम शेख (रा. शिर्डी) असे पळून गेलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समीर शेख याच्यावर शिर्डी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी त्याला अटक केली होती. त्यानंतर त्याची रवानगी न्यायालयाने कोठडीत केली. त्याला कोपरगाव कारागृहात ठेवण्यात आले होते. या दरम्यान त्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला उपचारासाठी काही दिवसांपूर्वी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्याच्यासोबत दोन पोलिस कर्मचारी होते. मात्र, उपचार सुरू असताना आज (शुक्रवारी) पहाटे तो ससून रुग्णालयातून पसार झाला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांनी पुणे पोलिसांशी संपर्क साधत माहिती दिली. त्यानुसार आता त्याचा शोध घेतला जात आहे.