Pune News : तब्बल 10 वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणार्‍याच्या दत्तवाडी पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  दहा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या एकाला दत्तवाडीच्या तपास पथकाने सापळा रचून अटक केली. खुनाच्या प्रयत्नाचे गुन्ह्यात तो गेके दहा वर्षे झोले फरार होता.
अभिषेक उर्फ गुड्डू जगन्नाथ भालेराव (वय 29, रा. पर्वती पायथा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

मित्राच्या बहिणीची चेष्टा मस्करी केल्याच्या रागातून 2011 मध्ये आरोपी अभिषेक व त्याच्या मित्रांनी एका तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार केले होते. हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत इतर आरोपींना अटक केली होती. मात्र अभिषेक हा पसार झाला होता. दरम्यान त्याचा शोध पोलीस घेत होते. पण तो पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत होता. आता स्थानिक पोलीस व गुन्हे शाखेच्या पोलिसांना पाहिजे आरोपी व सराईत गुन्हेगारांची माहिती काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार पोलीस शोध घेत आहेत. यादरम्यान दत्तवाडी पोलीस शोध घेत असताना कर्मचारी राहुल ओलेकर यांना बतमीदारामार्फत माहिती मिळाली की दहा वर्षांपूर्वी गुन्हा केलेला एक आरोपी हा निलायम टॉकीजजवळ थांबला आहे. त्यानुसार पथकाने याठिकाणी सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने गुन्हा केक्याची कबुली दिली.

ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक कृष्णा इंदलकर, पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, पोलीस हवालदार कुंदन शिंदे, महेश गाढवे, राहुल ओलेकर, शिवाजी क्षीरसागर, शरद राऊत व त्यांच्या पथकाने केली आहे.