एकीलाच नव्हे तर अनेक युवतींना ‘फिरवण्यासाठी’ अन् त्यांच्यावर छाप पाडण्यासाठी त्यानं चोरल्या दुचाकी, दत्तवाडी पोलिसांकडून ‘मजनू’ला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – प्रियसीला फिरवण्यासाठी अन् मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या तरुणाला दत्तवाडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून 5 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

सौरभ दत्तात्रय चोरगे (वय 20, रा. सर्व्हे न. 15, आंबेगाव पठार) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात वाढत्या गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी स्थानिक पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार सराईत गुन्हेगार व वाहन चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. यादरम्यान तपास पथकाचे पोलीस हवालदार कुंदन शिंदे व कर्मचारी सागर सुतार यांना बतमीदारामार्फत माहिती मिळाली की एकजण चोरीची दुचाकी घेऊन वसंतराव बागुल उद्योनाजवळ थांबला आहे. त्यानुसार या माहितीची खातरजमा केली.

त्यानंतर वरिष्ठ निरीक्षक राम राजमाने, पोलीस निरीक्षक खोमणे, उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, पोलिस हवालदार कुंदन शिंदे, राजू जाधव, सागर सुतकर, अमित सुर्वे, नवनाथ भोसले, अक्षयकुमार वाबळे, प्रमोद भोसले, शरद राऊत, विष्णू सुतार व त्यांच्या पथकाने या ठिकाणी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरीची असल्याचे कबूल केले. त्याला ताब्यात घेऊन सखोल तपास केला असता त्याने शहरातील विविध भागातून दुचाकी चोरल्या असल्याचे सांगितले. चौकशीत त्याच्या अनेक मैत्रिणी आहेत. त्यांच्यावर छाप पाढण्यासाठी तो दुचाकी चोरत असे. त्या दुचाकीवरुन त्या मैत्रिणींना फिरवत होता.