Pune News : शहरातील विविध भागातून वाहने चोरणार्‍या सराईत गुन्हेगारांना दत्तवाडी पोलिसांकडून अटक, 5 वाहने जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  शहरातील विविध भागातून वाहने चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारांना दत्तवाडी पोलिसांच्या तपास पथकाने सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून 1 कार आणि 4 दुचाकी असा ऐवज जप्त केला आहे.

राजू उर्फ गुडया मधुकर पवार (वय 19, रा. सोलापूर) व महंमद उर्फ मम्हद्या अन्वर शेख (वय 19) अशी अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

दोघेही सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील बाभूळगाव येथील आहेत. ते सराईत वाहन चोर असून, त्यांच्यावर हडपसर, माळशिरस व पंढरपूर याठिकाणी घरफोडी व वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

शहरात वाढत्या वाहन चोरी व इतर गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी गस्त घातली जात आहे. तसेच चोरट्यांची माहिती काढली जात आहे. यादरम्यान दत्तवाडी पोलीस ठाण्याचे पथक गस्त घालत होते. यावेळी जनता वसाहत कॉर्नरला दोघेजण दुचाकी घेऊन संशयितरित्या थांबले असल्याचे दिसून आले. पथकाने तात्काळ त्यांना थांबवत चौकशी केली. त्यावेळी त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना ताब्यात घेत सखोल तपास केल्यानंतर त्यांनी दुचाकी चोरी व स्कारपियो चोरीची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून 4 दुचाकी व कार जप्त करण्यात आली आहे.

ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक कृष्णा इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कुंदन शिंदे, राहुल ओलेकर, अमित सुर्वे तसेच नवनाथ भोसले यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.