Pune News : बेकायदेशीर पिस्तुल बाळगणार्‍याला दत्तवाडी पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  बेकायदेशीर पिस्तुल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला दत्तवाडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तुल जप्त करण्यात आले आहे.

निखिल वसंत जगदाळे (वय 32, साई चौकाजवळ, आंबेगाव पठार) असे सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो कुख्यात अफसर कांबळे गॅंगचा सक्रिय सदस्य आहे.

निखिल जगदाळे हा सराईत गुन्हेगार असून, धनकवडी येथे 2012 साले झालेल्या धुळे खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी आहे. याप्रकरणी त्याच्याविरोधात सहकारनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल होता.

दरम्यान वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा व स्थानिक पोलीसांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार हद्दीत गस्त घातली जात आहे. यावेळी दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाला पर्वतीदर्शन येथील पुलाखाली निखिल जगदाळे हा पिस्तुल घेऊन उभा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिस पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. त्याची अंगझडतीत घेतली असती त्याच्याजवळ एक देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे सापडली. 30 हजार 400 इतकी त्याची किंमत आहे. त्याने हे पिस्टल जवळ का बाळगले होते, याचा तपास केला जात आहे.

वरिष्ठ निरीक्षक कृष्णा इंदलकर, पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, पोलीस हवालदार कुंदन शिंदे, अक्षयकुमार वाबळे, सागर सुचतर, अमित सुर्वे, नवनाथ भोसले, शरद राऊत, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर, प्रमोद भोसले यांनी ही कारवाई केली आहे.