Pune News : कात्रज परिसरात मध्यरात्री गोळीबार करणार्यांना दत्तवाडी पोलिसांकडून अटक, पिस्तुलासह काडतुसे जप्त
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कात्रज भागात मध्यरात्री गोळीबार करत दहशत पसरवून पसार झालेल्या सराईत गुन्हेगारासह तडीपार गुंडाला दत्तवाडी पोलिसांच्या डीबी पथकाने सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडूज पिस्तुल आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे त्यांनी फरार काळात हडपसर येथे एका दुचाकीस्वाराकडील 4 लाख रुपयांची रोकड लुटली होती. अजय भागवत घाडगे (वय 21 वर्ष) गणेश कवीश पवार (वय 21 वर्ष ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात आर्म ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील जाभुळवाडीत डिसेंबर महिन्यात दुपारी तरुणाच्या गटात वाद झाल्यानंतर मध्यरात्री गणेश पवार व त्याच्या साथीदारांनी येथे येऊन गोळीबार करत दगडफेक व कोयते हातात घेऊन तुफान दहशत माजवली होती. यामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण गणेश पवार हा या घटनेनंतर पसार झाला होता. त्याचा गुन्हे शाखा आणि भारती विद्यापीठ पोलीस शोध घेत होते. पण तो सापडत नव्हता. दरम्यान दत्तवाडी पोलिसांचे डीबी पथक वाढत्या गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी गस्त घालत होते. यावेळी कर्मचारी कुंदन शिंदे आणि अमित सुर्वे यांना एकजण दांडेकर पूल परिसरात थांबला आहे, अशी माहिती मिळाली.
त्यानंतर दत्तवाडी पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे सापडली. चौकशी केल्यानंतर गणेश पवार याने काही महिन्यांपूर्वी गोळीबार केला असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केला असल्याचे सांगितले. तर चौकशीत या गोळीबाराच्या गुन्ह्यात पसार असताना त्यांनी हडपसर परिसरात एका दुचाकीस्वाराला लुटले होते. शास्त्रचा धाक दाखवत 3 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा देखील एक गुन्हा उघडकीस आला आहे.
गणेश पवार हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरोधात जाळपोळ, मारामाऱ्या, तोडफोड, खुनाचा प्रयत्न अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. तर अजय घाडगे याला पुणे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आलेले आहे. तरीही तो शहरात येऊन गुन्हे करत होता. या दोन्ही आरोपींना दत्तवाडी पोलिसांनी दोन किलोमीटरपर्यंत पाठलाग करून पकडले आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक कृष्णा इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, पोलीस हवालदार कुंदन शिंदे, कर्मचारी अमित सुर्वे व त्यांच्या पथकाने केली आहे.