Pune News : लक्ष्मीनारायण थिएटरजवळ पेपर विक्रेत्याला लुटणार्‍या दोघांना दत्तवाडी पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  लक्ष्मीनारायण थिएटरजवळ भल्या सकाळी पेपर विक्रेत्याची फिल्मी स्टाईल 90 हजारांची रोकड असलेली बॅग पळविणाऱ्या टोळीतील दोघांना दत्तवाडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. पेपर घेण्यासाठी आलेल्या ग्राहकाने पळून जाताना चोरट्यांची दुचाकी लात मारत खाली पाडली होती. त्यावेळी एकाने तोंडावर फायटरने मारत धूम ठोकली, तर इतर दोघे फिर्यादीना तलवार व कोयता दाखवत पसार झाले होते.

गौरव ऊर्फ लाल्या सुहास फडनीस (वय 30, रा. पर्वती दर्शन) व अक्षय ऊर्फ पप्पू कैलास गरुड (वय 22, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी शंकर अण्णा खुटवड (वय 50, शिवशक्ती हाइट्स चैतन्यनगर, धनकवडी) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

फिर्यादी यांचा पेपर विक्रीचा व्यवसाय आहे. दरम्यान, घाऱ्या ऊर्फ सचिन हा फिर्यादी यांना ओळखतो. त्याला फिर्यादी यांच्या बॅगेत रोकड असते, याची माहिती असते. दोन दिवसांपूर्वी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे लक्ष्मीनारायण थिएटरसमोर असणाऱ्या पुलाखाली पेपर विक्रीकरिता थांबले होते. यावेळी त्यांच्याजवळ असलेल्या शबनम बॅगेत बँकेत भरण्यासाठी 90 हजार 300 रुपये होते. याचवेळी शाईन या दुचाकीवरून तीन व्यक्ती येथे आल्या, त्यातील एकाने गाडीवरून खाली उतरून फिर्यादी यांच्या समोर असलेली शबनम बॅग हिसकावली व गाडीवर बसून पळाला. यावेळी फिर्यादीने आरडाओरडा केला. यावेळी पेपर विकत घेण्यासाठी आलेले प्रीतम अनिल पिंपळे यांनी चोरट्यांचा पाठलाग केला आणि दुचाकीवर लाथ मारून खाली पाडली.

पिंपळे यांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला. पण एकाने त्यांच्या तोंडावर फायटरने मारले अन् तो सटकला, तर दुसऱ्याने चाकू काढून पिंपळे यांच्यावर उगारला, तर तिसर्‍याने पिंपळे यांना तलवारीचा धाक दाखवला व तिघेही पळून गेले. दरम्यान, चोरट्यांची खाली पडलेली दुचाकी आरोपी घाऱ्या ऊर्फ सचिन सोंडकर याने पळवून नेण्याचा प्रयत्न केला.

माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथे भेट दिली होती. दरम्यान, याचा तपास दत्तवाडी पोलीस करत होते. त्यावेळी पोलीस हवालदार कुंदन शिंदे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दोघे जण पर्वती येथील लोखंडी पुलाजवळ येणार आहेत. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक कृष्णा इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, कर्मचारी महेश गाढवे, अक्षयकुमार वाबळे व प्रमोद भोसले यांच्या पथकाने या दोघांना सापळा रचून अटक केली आहे. दोघेही सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर दत्तवाडी, बिबवेवाडी, स्वारगेट, वारजे माळवाडी यासह वेगवेगळ्या शहरात गुन्हे दाखल झाले आहेत.