Pune News : दिल्ली दरवाजा उघडून शनिवारवाड्याचा वाढदिवस साजरा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अनेक पराक्रमी वीरांच्या पदस्पर्शाने पावन झालेला शनिवारवाडा…स्वाभिमान जागृत करणारा शनिवारवाडा. शनिवार वाड्याच्या दगड्याच्या चिराचिरात पराक्रमाचा इतिहास आहे. हा वाडा कधीच शांत नव्हता, कारण पराक्रमाचा सूर्य कधीच शांत नसतो, असा शनिवारवाड्याचा इतिहास सांगत शनिवार वाड्याचा भव्य दिल्ली दरवाजा पूर्णपणे उघडण्यात आला. रांगोळीच्या पायघड्या आणि हार तोरणांनी सजविलेला, पुण्याचे वैभव असलेल्या शनिवार वाड्याचा २८९ वा वर्धापनदिन पुणेकरांच्या उपस्थितीत साजरा झाला.

थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे शनिवार वाड्याच्या २८९ व्या वर्धापनदिनानिमित्त शनिवार वाड्यात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ मोहन शेटे यांनी शनिवार वाड्याच्या आणि पेशव्यांच्या गौरवशाली इतिहासाची माहिती उपस्थितांना दिली. माजी आमदार मेधा कुलकर्णी, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, पेशव्यांचे वंशज उदयसिंह पेशवे आणि कुटुंबिय, प्रतिष्ठानचे अध्यक्ष निवृत्त एअर चिफ मार्शल भूषण गोखले, सचिव कुंदनकुमार साठे, मुकुंद काळे, श्रीकांत नगरकर, चिंतामणी क्षीरसागर, ब्राह्मण महासंघाचे मकरंद माणकीकर,आनंद दवे, माधव गांगल, रविंद्र कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे व श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून करण्यात आली.

मोहन शेटे म्हणाले, या जागेचे १७३० मध्ये भूमीपूजन झाले होते. आणि त्यानंतर २२ जानेवारी १७३२ रोजी शनिवार वाड्याची वास्तूशांत झाली. परंतु हा वाडा कधीच शांत नव्हता, पराक्रमाचा सूर्य कधीच शांत नसतो. शनिवार वाड्यासारख्या भव्य वास्तू महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये अनेक असतील परंतु या वास्तुसमोर जो पराक्रम घडला आहे, त्या पराक्रमाची तुलना करता येणार नाही. सतत ८० वर्ष भारतावर प्रभुत्व निर्माण करण्याचे काम या वाड्याने केले होते. पराक्रमाचा इतिहास या वाडयाला लाभला आहे.