Pune News : ऑर्डर रद्द केल्याच्या रागातून डिलीव्हरी बॉयकडून तरूणाला बेदम मारहाण, पुण्यातील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ऑर्डर कॅन्सल केल्याच्या रागातून डिलिव्हरी बॉय ने एका ग्राहकाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. याप्रकरणी चतुशृंगी पोलीस स्टेशनमध्ये दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 20 फेब्रुवारीच्या रात्री साडेआठ वाजता बाणेर परिसरात ही घटना घडली.

विशाल विजय अग्रवाल (वय 40, रा. अक्सिस स्ट्रीट बाणेर रोड, पुणे) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून रामेश्वर वाघाजी तडसे (वय अंदाजे 35) आणि अन्य-एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांनी झोमॅटो ॲप वरून ऑर्डर दिली होती. त्यानुसार आरोपी हा अर्ज घेऊन त्या ठिकाणी आले होते. परंतु फिर्यादीने ऑर्डर घेऊन आलेल्या रायडरला फोन केला होता परंतु रायडरने फोन न उचलल्यामुळे फिर्यादी यांनी झोमॅटो हेल्पलाइनला फोन करून रायडर आला नाही असे सांगितले. त्यामुळे ऑर्डर घेऊन दुसरा रायडर आला. त्याच दरम्यान पहिला रायडर ही ऑर्डर घेऊन त्या ठिकाणी आला. त्यावेळी त्यांनी माझी ऑर्डर कॅन्सल का केली असे म्हणत मारहाण केली. त्याशिवाय फिर्यादी यांच्या हॉटेलमधून दरवाजाची म्युझिक फ्लॅट तोडून नुकसानही केले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.