Pune News : बंजारा समाजाची नाहक बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात काही राजकीय पक्षांकडून बंजारा समाजाची नाहक बदनामी केली जात असून, पीडित तरूणीचे फोटो, ऑडिओ क्लिप वारंवार प्रसारमाध्यमांवर प्रसारित करून चारित्र्यहनन केल्याचा प्रयत्न केला जात आहे, असे आरोप करत अ‍ॅड. राठोड यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

बदनामी केल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप उपप्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, नगरसेवक धनराज घोगरे, आमदार अतुल भातखळकर यांच्यासह ९ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी अ‍ॅड रमेश राठोड यांनी केली आहे.

पंधरा दिवसांपूर्वी परळीच्या पूजा चव्हाण या तरुणाने उडी मारून आत्महत्या केली होती. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद आहे. पण यात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे नाव आल्याने खळबळ उडाली. दरम्यान यानंतर भाजपने याप्रकरणी गुन्हा दाखल करावी, अशी मागणी केली. तर यावरून राज्यात रान माजवले आहे. भाजपच्या नेते मंडळींकडून बंजारा समाजाची बदनामी केली जात आहे. सोशल मीडियावर पीडित तरूणीबाबत दिवसेंदिवस विविध ऑडिओ क्लिप व फोटो व्हायरल करून बदनामी केली जात आहे. त्यामुळे बंजारा समाजाची बदनामी होत आहे. ही बदनामी थांबविण्याची मागणीही अ‍ॅड. राठोड यांनी तक्रारी अर्जाद्वारे केली आहे. त्याशिवाय समाजाची बदनामी केल्याप्रकरणी संबंधितांविरूद्ध गुन्हा दाखल करावी. तसेच पीडित कुटूंबियांना पोलीस संरक्षण देण्यात यावे. राज्यघटनेतील ३९ कलमानुसार प्री लिगल सव्र्हिस देण्याची मागणी त्यांनी केली आहे.