Pune News : तऱ्हेवाईक प्रेमीयुगुलाची इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – प्रेमीयुगुलांची बातच जरा न्यारी असते. त्यातच पुणेकर म्हटले की, सर्वांच्याच भुवया उंचावतात. असाच एका प्रेमीयुगुलाने जरा हटके साखरपुडा केला आहे. चक्क तीन राज्यांमध्ये 731 किमी दुचाकीवर प्रवास करत तीन ठिकाणी साखरपुडा केला. त्यांची हटके साखरपुड्याची दखल इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे.

विशेष म्हणजे, नवी सांगवीतील (पुणे) येथील काजल गुगळे आणि आकाश अगरवाल यांच्या या अनोख्या साखरपुड्याची दखल इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे. काजल आणि आकाश त्यांच्या प्रेमाचे रुपांतर लग्नबंधनात झाले. त्यांच्या वाढत्या वयाबरोबरच प्रेमाचे जाणतेपणही अधिक बहरत गेले. आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर अधिक प्रगल्भ होत गेलेल्या या दोघांनी लग्नासाठीची वचनबद्धता नुकतीच एकमेकांच्या साक्षीने प्रकट केली.

व्यापारी नौदलात (मर्चंट नेव्ही) असलेला आकाश आणि कुटुंबाच्या व्यावसायात सहभागी असलेली काजल यांच्या आवडी-निवडी आणि छंदही एकच ही बाबसुद्धा बरेच काही सांगून जाते. भरपूर फिरणे, स्वतःला ‘एक्स्प्लोअर’ करणे, जग समजून घेण्याची उत्कटता या त्यांच्या छंदांनी त्यांना अधिक जवळ आणले. २०1८ मध्ये आकाशने काजलला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. सुमारे एक तप चाललेल्या या प्रेमबंधाला समाजासमोर व्यक्त करण्यासाठी त्यांनी काहीतरी हटके करण्याचे ठरविले. काजल म्हणते, ‘‘आम्हा दोघांनाही फिरण्याची आवड आहे. त्यामुळे आम्ही कर्नाटकातील गोकर्ण, गोव्यातील पेलोलीम आणि अलिबागच्या समुद्र किनाऱ्यांवर ऐंगेजमेंट करण्याचे ठरविले. सर्व साहित्य घेऊन गुरूवारच्या मध्यरात्रीनंतर म्हणजे, शुक्रवारी पाऊण एक वाजता आम्ही गोकर्णला साखरपुडा केला. तेथून दुचाकीवर ९० किमी प्रवास करत गोव्यात बीचवर दूसरा साखरपुडा केला.

यावेळी सोबत मित्र आणि कुटुंबीयांची एक टीम होती. अलिबागला मात्र, आमचे दोन्ही
कुटुंबीय आणि जवळचे नातेवाईक वाट पाहत होते. तिथे आम्ही त्या दिवशीच्या संध्याकाळी साडेसहाला पोबोचलो आणि विधिवत तिसरा साखरपुडा केला. ’’आजवर अशा पद्धतीने कोणीच साखरपुडा केला नाही. आमच्या या अनोख्या प्रवासाची नोंद इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे, असे आकाशने सांगितले. सुरुवातीला विरोध करणाऱ्या कुटुंबीयांना व्यवस्थित समजाऊन सांगितले आणि त्यांना विश्वासात घेतले तर, तेही आपल्या आनंदात सहभागी होतात. याचे उदाहरण या प्रेमीयुगलाने आपल्यासमोर प्रस्थापित केले आहे.

प्रेमविवाहांचे प्रमाण जरी वाढले, तरी अजूनही समाज खुल्या हृदयाने त्याचा स्वीकार करताना दिसत नाही. मुलगा आणि मुलगी दोघेही स्वतःच्या पायावर उभे राहिले, पालकांना समजावून सांगितले तर, असे विवाह निश्चितच वाढतील. आमच्या या अभिनव प्रयत्नातून समाजाची प्रेमविवाह स्वीकारण्याची मानसिकता वाढावी, असा आमचा प्रयत्न आहे.
काजल आणि आकाश