Pune News : 5 कोटींच्या जीएसटी चोरी प्रकरणात जगदंबा एंटरप्रायजेसच्या संचालकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोणत्याही मालाची खरेदी विक्री न करता तब्बल 32 कोटी रुपयांची बनावट जीएसटी बिले बनवून 5 कोटींपेक्षाही जास्त जीएसटी चुकविण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पुण्यातील जगदंबा एंटरप्रायजेसच्या संचालकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई जीएसटी आयुक्तालयाने केली आहे. नरेश बन्सल असे अटक करण्यात आलेल्या संचालकांचे नाव आहे.

जगदंबा एंटरप्रायजेसच्या संचालकाने दिल्लीस्थित बनावट कंपन्यांकडून मालाची तब्बल 32 कोटी रुपयांची बिले मिळवली. त्या बिलांच्या आधारे सुमारे 5.6 कोटी रुपयांचे बनावट जीएसटी क्रेडिट वापरून तयार मालाची बनावट बिले तयार केली. या संपूर्ण व्यावहारामध्ये कोठेही मालाची खरेदी विक्री न झाल्याने सुमारे 5 कोटी रुपयांपेक्षाही जास्त जीएसटी बुडविला गेला. त्याची सेंट्रल जीएसटी आयुक्तालयाने दखल घेऊन कंपनीवर छापा टाकला.

संचालक नरेश बन्सल याची चौकशी केली. चौकशीमध्ये त्याने या गुन्ह्याची कबुली दिली. त्याधारे त्याला अटक करुन 2 मार्च रोजी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणात संपूर्ण आर्थिक व्यवहाराची शहानिशा केली जात आहे, अशी माहिती जीएसटी आयुक्तालयाच्या मुख्यालय दक्षता पथकाचे उपायुक्त सचिन घागरे यांनी दिली.