Pune News : दोन बिल्डरमध्ये वाद ! बड्या भागीदारीतील संस्थेच्या माजी संचालकाकडून ऑफिसमध्ये घुसून तोडफोड, लावली आग आणि केला आत्महत्येचा प्रयत्न

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरातील बड्या भागीदारीत असलेल्या संस्थेच्या एका माजी संचालकाने आर्थिक वादातून ऑफिसमध्ये घुसून ऑफिसची तोडफोड करत आग लावून दिली. तर स्वतः ऑफिसमध्ये आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला. धनकवडी भागात हा प्रकार घडला आहे. दोन बिल्डरांमध्ये झालेल्या वादाने खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी हसमुख बाबूलाल जैन (रा. गुलटेकडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत भरत नागोरी (वय 61) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे व्यापारी आहेत. त्यांचे शंकर महाराज मठाशेजारी ऑफिस आहे. दरम्यान 2006 मध्ये आरोपी जैन, फिर्यादी व इतरांनी ईशा ग्रुप नावाने भागीदारीत संस्था स्थापन केली होती. त्यात फिर्यादी नागोरी, जैन व स्वर्णसिंग सोहेल हे 2014 पर्यंत संचालक होते. त्यानंतर जैन याने ईशा संस्थेच्या अंतर्गत असलेल्या ईशा स्ट्रक्चर्स लिमिटेड कंपनीचा राजीनामा दिला होता. मात्र यानंतर या कंपनीच्या भागीदारामध्ये न्यायालयात अनेक दावे सुरू आहेत.

तर फिर्यादी व जैन यांच्यात आर्थिक व इतर गोष्टीसाठी वाद सुरू आहेत. गुरुवारी दुपारी जैन हा फिर्यादी यांच्या धनकवडी येथील ऑफिसमध्ये गेला. तसेच त्यांच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी करत ऑफिसमधून बाहेर काढले व आतून ऑफिस लावून घेतले. तसेच ऑफिसची तोडफोड केली. त्यानंतर त्याला आग लावून स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. भरदिवसा हा प्रकार घडल्याने चांगलाच गोंधळ उडाला होता. माहिती मिळताच सहकारनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पाहणीकरून गुन्हा दाखल केला आहे. यात 20 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.