Pune News : विस्कळीत आणि दूषित पाणीपुरवठ्यामुळे ससाणेनगरमधील नागरिक त्रासले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हडपसर (ससाणेनगर) मध्ये विस्कळीत आणि मैला-माती मिश्रीत दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक कमालीचे त्रासले आहेत. मागिल आठवड्यापासून येथील नागरिकांना आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. पालिका प्रशासनाने तातडीने दखल घेऊन नियमित आणि शुद्ध पाणीपुरवठा करावा. प्रशासनाने शुद्ध पाणीपुरवठा केला नाही, तर नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा महेश ससाणे यांनी निवेदनाद्वारे महानगरपालिका प्रशासनाला दिला आहे.

दरवर्षी मार्च-एप्रिलपासून ससाणेनगर परिसरातील नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होतो, त्यामुळे आरोग्याच्या समस्या भेडसावतात. मागिल अनेक वर्षांपासून वारंवार पाणीपुरवठा विभागाकडे नियमित आणि शुद्ध पाणीपुरवठा करावा, यासाठी स्थानिक नागरिकांनी हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील पाणीपुरवठा विभागासह महापालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांकडे आंदोलन करून लेखी तक्रारी दिल्या आहेत. मात्र, अद्याप त्याची दखल का घेतली जात नाही, असा संतप्त स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.

ससाणेनगर महेश ससाणे म्हणाले की, मागिल आठवडाभरापासून पिण्याचे पाणी वेळेवर येत नाही. या परिसरातील सोसायट्या आणि गल्ल्यांमधील नागरिकांना नळाद्वारे मातीमिश्रीत दूषित पाणी येत आहे. सुरुवातीला आलेल्या पाण्याचा दुर्गंधीयुक्त वास येत. दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की, पाण्याची ही परिस्थिती असते. दूषित पाण्यामुळे नागरिकांना साथीचाच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. मागिल वर्षापासून नागरिकांमध्ये कोरोनाची भीती आहे. सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच दूषित पाण्यामुळे नागरिक कमालीचे त्रासले आहेत. पालिका प्रशासाने नियमित आणि शुद्ध पाणीपुरवठा करावा, अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असे ससाणे यांनी सांगितले.