Pune News : घटस्फोट घेतलेल्या पत्नीनं काळी जादू केल्याचा संशय, उतरविण्यासाठी 2 भोंदूबाबांनी पावणे चार लाखाला गंडवलं, कोंढव्यातील घटना

पुणे ( Pune) : पोलिसनामा ऑनलाइन – घटस्फोट घेतलेल्या पत्नीने काळी जादू केली असून त्यातून बाहेर पडण्यासाठी ती काळी जादू उतरवण्यासाठी कबुतरे आणावे लागतील आणि मग ती उतरवू असे सांगत दोन भोंदू बाबांनी एकाला पावणे चार लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील ( Pune)  कोंढवा परिसरात हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी कुतुबुद्दीन नजमी (रा.काेंढवा,पुणे) व हकिमुद्दीनराज मालेगावंवाला (रा.काेंढवा खुर्द ,पुणे) या आराेपींवर जादूटाेणा प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अबिझर जुझर फतेपुरवाला (वय- 36,रा.काेंढवा बु,पुणे) यांनी कोंढवा पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अबिझर यांचा भाऊ हुझेफा याचे 2010 मध्ये गुजरात मधील मुलीसाेबत लग्न झाले हाेते. परंतु पत्नीपासून मूल हाेत नसल्याने त्यांचे 2017 मध्ये संमतीने घटस्फाेट घेतला हाेता. चार महिन्यापूर्वी हुझेफा हा तापाच्या कारणामुळे आजारी पडला हाेता. त्याला काेराेना झाले असेल या शंकेने कुटुंबाने त्याची चाचणी करुन घेतली. त्याचा रिपाेर्ट निगेटिव्ह आला. त्यानंतर अनेकदा उपचार करूनही प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी धर्मगुरु सय्यदना सैफुदीन यांना मुलाची तब्येत ठिक हाेण्याकरिता अल्लाकडे प्रार्थना करण्याची विनंती करण्याबाबत अर्ज देण्यास गेले हाेते. त्यावेळी त्यांना तिथे हकिमउद्दीन मालेगाववाला भेटला. त्यास हुझेफाचे आजारपणाबाबत सांगितले असता त्याने मी तुमचे घरी येऊन मुलास पाहताे असे सांगितले. त्याप्रमाणे हकिमउद्दीन एका माणसाला घेऊन हुझेफा याचे घरी गेला. त्यावेळी त्याने मांत्रिक उपचार करुन हुझेफा याचे पत्नीचा फाेटाे पाहण्यास मागून ताे पाहत त्याने दुसऱ्या दिवशी कुटुंबियांना भेटण्यास बाेलवून हुझेफाचे पत्नीने त्याचेवर काळी जादू केल्याचे सांगितले. त्यामुळे त्यास त्रास हाेत असल्याचे म्हणाला. ताे मरणाचे दारात असून त्याचा कधी मृत्यु हाेऊ शकताे असे सांगुन घरातील आणखी दाेन लाेकांना काळया जादुचा त्रास हाेऊ शकताे सांगितले. त्यावर उपचार करण्याकरिता त्याने मुंबईत सैफी, महेल येथे जाऊन महागडी कबुतरे खरेदी करावी लागतील, ती कबुतरे काळी जादूची बला त्यांचे अंगावर घेतात, त्यामुळे आपल्याला त्रास हाेत नाही असे सांगत चार कबुतरे खरेदी करण्यास सहा लाख 80 हजार रुपये मागितले. त्यानुसार फिर्यादी यांच्या वडिलांच्या बँक खात्यातून 3 लाख 80 हजार रुपये काढून ते दिले. पण तरीही त्यांचा आजार राहिला नाही. यावेळी त्यांना फसवणूक झाली असल्याचे समजले. त्यानंतर त्यानी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.