Pune News : लॉकडाऊन दरम्यान तुमच्याही बाळाचे लसीकरण चुकलेय तर घाबरू नका !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बाळाचा विकास होत असताना त्याची विशेष देखभाल घेणे गरजेचे आहे. सुरुवातीला नाजूक असलेले बाळ हळूहळू सक्षम होत असते आणि त्याच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यासही तितकाच कालावधी जातो. या दरम्यान आपल्या बाळाला जीवघेण्या रोगांपासून बाळाला वाचवण्यासाठी तसेच संसर्गाची लागण होऊ नये याकरिता विविध आजारांच्या लसी दिल्या जातात. बाळ मोठे होईपर्यंत एक एक लस देणे अनिवार्य असते. लॉकडाऊन कालावधीमध्ये अनेक बाळांचे डोस चुकले. रुग्णालयाला भेट देण्याची भीती अनेकांच्या मनात आहे. पण तुमच्या बाळाला सुरक्षित ठेवण्यासाठी लसीकरण हे अत्यंत महत्त्वाचं आहे हे देखील समजून घेणं गरजेचं आहे. लहान मुलांना संसर्गाचा जास्त धोका असतो आणि त्यांना लसीकरणापासून दूर ठेवणं म्हणजे धोका आणखी वाढवण्यासारखं आहे.

लसीकरण चुकले तर काय असा प्रश्न सध्या अनेक पालकांच्या मनात उपस्थित झाला आहे. तुमच्या बाळाच्या लसीकरणाचं वेळापत्रक हे डॉक्टरांकडून तयार करण्यात आलेलं आहे, ज्यात त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व काळजी घेतलेली असते. हे वेळापत्रक चुकल्याने बाळाचा पुढील प्रवासही चुकण्याचा धोका असतो. दरम्यान, कधीच लस न देण्यापेक्षा उशिरा का होईना लस दिलेलं कधीही चांगलं अशी प्रतिक्रिया डॉ तुषार पारेख, कन्‍सल्‍टंट निओनॅटोलॉजिस्ट आणि बालरोग तज्ञ, मदरहुड हॉस्पीटल, पुणे यांनी व्यक्त केली.आपण आता अनलॉकमध्ये प्रवेश केला असून बालरोगतज्ज्ञाकडून तुम्ही नव्याने लसीकरण वेळापत्रक घेऊ शकता. डॉक्टर आणि रुग्णालये अत्यंत खबरदारीचे उपाय अवलंबत आहेत, ज्यात मोकळ्या जागेचं निर्जंतुकीकरण, फक्त डॉक्टर आणि कर्मचारीच नव्हे, तर रुग्णांसाठीही पीपीईचा वापर असे अनेक उपाय वैद्यकीय तज्ज्ञांकडून केले जात आहेत. यातील महत्त्वाचा मार्ग म्हणते तुम्ही आता लवकरात लवकर विलंब झालेली किंवा चुकवलेली लस तुमच्या बाळाला द्या.

अपोलो क्लिनिक, पुणे येथील डॉ. अंशु सेठी बालरोगतज्ज्ञ सांगतात आयुष्याच्या पहिल्या काही वर्षापर्यंत मुलांसाठी लसीकरण अनिवार्य आहे. लॉकडाऊननंतर ओपीडीमध्ये जवळपास 30% लसीकरण चुकवलेली प्रकरणे आढळली आहेत. 10 रुग्णांपैकी 3 रुग्ण हे आपल्या बाळाची चुकलेल्या लसीकरणासाठी येतात. पालक कोविडमुळे बाहेर पडण्यास घाबरत असल्याने लसीकरण टाळण्याच आले असून अशा बालकांच्या लसीकरणाचे वेळापत्रक पुन्हा बदलून नव्याने लसीकरण सुरु करण्यात आले आहे. लक्षात ठेवा, मुलांसाठी अद्यापही कोविड लस घेणेबाबत निर्णय झालेला नाही. परंतु हिपॅटायटीस बी, गोवर, मेनिंजायटीस, रुबेला आणि क्षयरोग सारख्या इतर आजारांना लसीकरणाने रोखता येऊ शकते आणि त्याकरिता लसीकरण करणे अत्यावश्यक आहे.